HomeNewsनागपुर डिवीजन

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर राजुरातील आठवडी बाजार २६ सप्टेंबरला बंद.

– कायदा-सुव्यवस्था व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस व नगर परिषद प्रशासनाचा निर्णय.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.२३ सप्टेंबर

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी भरणारा राजुरा येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पोलीस स्टेशन राजुरा यांच्या वतीने नगर परिषद राजुरा प्रशासनाला पत्र देण्यात आले होते. पत्रानुसार राजुरा शहरातील विविध गणेश मंडळांकडून दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली असून, दि. २० ते २७ सप्टेंबरदरम्यान विविध मंडळांकडून गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. त्यात राजुरा शहरातील मुख्य गणेशमूर्तींचे विसर्जन शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आले आहे.
एकाच दिवशी गणेश विसर्जनाच्या मिरवणुका आणि आठवडी बाजारामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने २६ सप्टेंबरचा आठवडी बाजार इतर दिवशी भरविण्याची विनंती पोलिसांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली होती. या पत्राच्या अनुषंगाने नगर परिषद राजुरा प्रशासनाने २३ सप्टेंबर २०२६ रोजी आठवडी बाजार कंत्राटदाराला लेखी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार दि. २६ सप्टेंबर रोजी शनिवारचा आठवडी बाजार भरवू नये तसेच त्या दिवशी बाजारातील कोणत्याही प्रकारची दुकाने, हातगाड्या व इतर व्यावसायिक व्यवहार सुरू ठेवू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका व नागरिकांची गर्दी होणार असल्याने वाहतूक कोंडी टाळणे, नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था राखणे यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आठवडी बाजारातील व्यापारी, हातगाडीधारक व नागरिकांनी प्रशासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    You cannot copy content of this page