गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा , दि.९ सप्टेंबर
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात भरदिवसा गोळीबार करून खळबळ उडवून देणाऱ्या हत्याकांडातील सराईत गुन्हेगारांविरुद्ध राजुरा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ अर्थात ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच राजुरा पोलिस ठाण्यांतर्गत या कायद्याचा वापर करण्यात आला आहे.
दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वाजेदरम्यान राजुरा येथील सोमनाथपूर वॉर्ड येथील रहिवासी विनोद ऊर्फ पापा जनार्दन जाधव हे मित्रांसोबत राजुरा न्यायालय समोर एका पाणठेल्याजवळ बसले असताना आरोपी करण दुर्गराज मेकेलवार व करण दीपक बावीस्कर यांनी त्यांच्याशी वाद घालत दुचाकीने तेथे प्रवेश केला. यावेळी करण दीपक बावीस्कर याने स्वतःजवळील पिस्तुलातून विनोद ऊर्फ पापा जाधव यांच्यावर गोळीबार करून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेप्रकरणी राजुरा पोलिस ठाण्यात अप. क्र. ६९५/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३(५) तसेच संबंधित भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तीन आरोपींना अटक
गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या आरोपीव्यतिरिक्त गुन्ह्याचा कट रचणारे, अपप्रेरणा देणारे तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणारे परवेज सरवर शेख, कार्तिक उमेश खामनकर आणि सौरभ ऊर्फ भुर्जी उमेश खामनकर यांना अटक करण्यात आली.
आरोपींकडून ३ अग्निशस्त्रे, ३ रिकाम्या मॅगझिन आणि ६ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोक्का
अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी राजुरा पोलिसांकडून विशेष पोलिस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांच्याकडे मोक्का कारवाईचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी देत विशेष पोलिस महानिरीक्षकांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) १९९९ चे कलम लागू करण्यास रीतसर परवानगी दिली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर काटकर, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच सहायक पोलिस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन चिंचोळकर, पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे व पोहवा कैलास आलाम यांनी यशस्वीपणे पार पाडली.
