गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. २५ ऑगस्ट २०२६ : समाजातील गरजू आणि तळागाळातील घटकांना आधार देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून रोटरी क्लब राजुरा तर्फे शहरातील छोट्या व फूटपाथवरील व्यवसायिकांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात पावसापासून तसेच उन्हाळ्यात कडक उन्हापासून व्यवसायिकांचे संरक्षण व्हावे, या विधायक उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

शहरातील नाका नंबर ३, भारत चौक, गांधी चौक, नेहरू चौक, जुना बस स्टॉप तसेच पंचायत समिती रोड परिसरातील छोट्या व्यावसायिकांना या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने चर्मकाम करणारे व्यावसायिक, हातगाडीवर भाजीपाला व फळे विकणारे, गॅस भरणा व रिपेरिंग करणारे, सुटे पान विक्रेते तसेच इतर छोटे व्यावसायिक यांचा समावेश होता.
दिवसभर ऊन-पावसाची पर्वा न करता कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या कष्टकरी व्यवसायिकांसाठी मोठी छत्री ही केवळ वस्तू नसून त्यांच्या श्रमाला मिळालेला सन्मान आणि आधार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे लाभार्थी व्यवसायिकांनी मनापासून स्वागत करून रोटरी क्लबचे आभार मानले व क्लबच्या सामाजिक कार्याला मनःपूर्वक आशीर्वाद दिले.
या कार्यक्रमास रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष राजू गोखरे, सचिव किशोर हिंगाणे, आयपीपी निखिल चांडक, माजी अध्यक्ष कमल बजाज, नवल झंवर, सदस्य विनोद चने, डॉ. पराग डोरलीकर तसेच रोटरी क्लबचे इतर सदस्य आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
“सेवा हीच खरी मानवता आणि समाजातील गरजू व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आमच्या कार्याचे खरे यश” या भावनेतून रोटरी क्लब राजुरा सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. तळागाळातील कष्टकरी व्यवसायिकांना दिलेली ही छत्री भविष्यातही रोटरीच्या सेवाकार्याची सावली बनून राहो आणि समाजसेवेचे हे कार्य अखंड सुरू राहो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
