वृक्ष रक्षाबंधनाच्या कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.

HomeNewsनागपुर डिवीजन

वृक्ष रक्षाबंधनाच्या कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.

आदर्श शाळेतील राष्ट्रीय हरित सेना व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रम
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. २५ ऑगस्ट :
वृक्ष हे केवळ निसर्गाचे सौंदर्य वाढविणारे घटक नसून मानवाच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक असलेले जीवनदायी घटक आहेत. वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, हा संदेश विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल, राजुरा, राष्ट्रीय हरित सेना आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मध्य चांदा वनविभागाच्या वनोद्यानात वृक्षरक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रक्षाबंधनाच्या पारंपरिक संकल्पनेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक राख्या वृक्षांना बांधून त्यांचे रक्षण करण्याचा संकल्प केला. वृक्षांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी ‘वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा’, ‘वृक्ष आहेत तरच जीवन आहे’ आणि ‘निसर्गाचे रक्षण म्हणजे मानवजातीचे रक्षण’ असा पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात वृक्षांविषयी प्रेम, जिव्हाळा आणि संरक्षणाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिरच्या ज्येष्ठ शिक्षिका ज्योती कलुरवार उपस्थित होत्या. विशेष अतिथी म्हणून वनविभाग परिक्षेत्र राजुराचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून वनपाल सुनील मेश्राम, वनपाल नरेंद्र देशकर, वनरक्षक पवन मंदुलवार, वनरक्षक सुरेश गिरडकर, कापणगाव वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र शिवणकर, वनरक्षक दांडेकर तसेच विद्यार्थी प्रतिनिधी श्रावण सुर्तेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व, जंगलांचे संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि वाढत्या पर्यावरणीय समस्यांवर विद्यार्थ्यांनी घ्यावयाची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. वृक्षांना राखी बांधणे ही केवळ प्रतीकात्मक कृती नसून वृक्षांचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण करण्याची प्रत्यक्ष जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या मनात लहानपणापासूनच निसर्गाविषयी संवेदनशीलता निर्माण झाली तर भविष्यात पर्यावरणपूरक समाज घडण्यास निश्चितच मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे श्रीरंग ढोबळे, रवी बुटले, संतोष दरेकर, सुनेना तांबेकर, प्रतीक काकडे, बबीता कांबळे, तसेच आदर्श शाळेतील मनिषा खामणकर, प्रशांत रागीट, निकिता भगत यांनी परिश्रम घेतले.
तसेच राष्ट्रीय हरित सेना इको क्लबच्या कचरा व्यवस्थापन, जैवविविधता, अन्न, ऊर्जा आणि पाणी या पाच गटांचे संघनायक व उपसंघनायक यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत सक्रिय सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत वृक्षांना राख्या बांधून त्यांचे संरक्षण करण्याचा संकल्प केला. त्यामुळे रक्षाबंधनाच्या सणाला पर्यावरण संवर्धनाची अभिनव जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसह उपस्थितांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. ‘वृक्षांशी नाते जोडूया, हिरवाईचे रक्षण करूया’ या संदेशातून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

    You cannot copy content of this page