गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. १४ ऑगस्ट :आर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य रॅली काढण्यात आली. देशभक्तीची भावना जागृत करणे, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान निर्माण करणे तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये शाळेचे संस्थापक समीर चिल्लावार, शाळेच्या उपमुख्याध्यापिका अनिता बोरकुटे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन परिसरातून रॅली काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी ‘भारत देश महान आहे’, ‘तिरंगा आमची शान आहे’ अशा घोषणा देत नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली. विद्यार्थ्यांच्या हातातील तिरंगे आणि देशभक्तीपर घोषणांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘राष्ट्रध्वजाशी ज्योत जागवूया’ असा संदेश देण्यात आला. प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून देशाप्रती आपली निष्ठा आणि अभिमान व्यक्त करण्याचे आवाहन करण्यात आले.शाळेतील विद्यार्थ्यांनी हातामध्ये राष्ट्रध्वज घेऊन ‘हर घर तिरंगा’ फडकविण्याचा संकल्प केला. आपल्या छोट्या कृतीतून राष्ट्रीय एकात्मतेचा मोठा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी या रॅलीच्या माध्यमातून केला.शाळेचे संस्थापक, उपमुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ‘हर घर तिरंगा’ रॅली उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय अभिमान आणि सामाजिक बांधिलकी रुजविणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

