गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. १४ ऑगस्ट :स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल, राजुरा येथे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अनोखा राष्ट्रभक्तीपर उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब तसेच स्काउट्स-गाईड्स, कब-बुलबुल युनिटच्या वतीने विद्यार्थ्यांची आकर्षक साखळी तयार करून ‘वंदे मातरम् 150’ असा संदेश साकारण्यात आला.
विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने बसून तयार केलेल्या या मानवी साखळीच्या माध्यमातून ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीला अभिवादन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, एकता, शिस्त आणि राष्ट्रीय मूल्यांची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
‘वंदे मातरम्’ हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेले गीत आहे. या गीताच्या माध्यमातून स्वातंत्र्यसैनिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत झाली. त्यामुळे त्याला १५० वर्षे पूर्ण होणे हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि स्मरणीय क्षण असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमासाठी राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा स्काउट्स मास्तर आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, बादल एन. बेले यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाबरोबरच राष्ट्रीय मूल्यांचे संवर्धन करावे, देशाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती घ्यावी आणि जबाबदार नागरिक म्हणून घडावे, असा संदेश त्यांनी दिला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती कल्लुरवार, रोशनी कांबळे, वैशाली टिपले, रूपेश चिडे, सुनीता कोरडे, अर्चना मारोटकर, जयश्री धोटे, वैशाली चिमूरकर, नवनाथ बुटले, विकास बावणे, आशा बोबडे, जयश्री शिवणकर, पूजा ढेंगळे, मनिषा खामणकर, सविता करमनकर, साक्षी गोंगले, अंजली कोंगरे आदी शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘वंदे मातरम् 150’ हा संदेश साकारल्याने संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, शिस्तीला आणि देशप्रेमाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.

