– ‘भांड्यांच्या दुनियेत’ पाठाचे प्रत्यक्ष वस्तूंच्या माध्यमातून अध्ययन.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.७ ऑगस्ट आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर, राजुरा येथे इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील ‘भांड्यांच्या दुनियेत’ या पाठाचे प्रत्यक्ष अनुभव व प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून अध्ययन करून देण्यात आले. पाठ्यपुस्तकातील माहिती केवळ वाचनापुरती मर्यादित न ठेवता विविध प्रकारची भांडी विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष आणून त्यांची ओळख करून देण्यात आली. मराठी विषयाचे शिक्षक बादल बेले यांनी विद्यार्थ्यांना मातीच्या भांड्यांपासून आधुनिक भांड्यांपर्यंतच्या विविध प्रकारांची प्रत्यक्ष माहिती दिली. यामध्ये मातीची भांडी, दगडी खलबत्ता, लाकडी व चामड्याची भांडी, वाळलेल्या भोपळ्यापासून तयार केलेले तुंबे, बांबूची भांडी, प्लास्टिकची भांडी तसेच चांदी, पितळ, तांबे, स्टेनलेस स्टील व ॲल्युमिनियमची भांडी यांचा समावेश होता. यासोबतच चिनी माती, सिरॅमिक्स, काच, नॉनस्टिक आणि कोटेड मेटलपासून तयार होणाऱ्या भांड्यांचीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. विविध धातूपासून भांडी कशी तयार होतात, त्यांचा वापर कशासाठी केला जातो आणि काळानुसार भांड्यांच्या निर्मितीत कसे बदल झाले, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रत्यक्ष वस्तू पाहून, हाताळून आणि त्यांची माहिती जाणून घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना पाठातील संकल्पना अधिक सहज व आनंददायी पद्धतीने समजल्या. या उपक्रमातून अनुभवाधारित व कृतीशील अध्ययनाला चालना मिळाली.
उपक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना ‘तुमच्या घरातील चार जुन्या भांड्यांची चित्रे काढा व रंगवा’ हा कृतीआधारित उपक्रम देण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पाठ्यपुस्तकातील आशय प्रत्यक्ष अनुभवाशी जोडून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना देणारा हा उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त ठरला.



