गौतम नगरी चौफेर न्यूज नेटवर्क.मुंबई गौतम धोटे – अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात सोमवारी मुंबईत हजारो भीमसैनिकांनी विविध राजकीय पक्षांचे मतभेद बाजूला ठेवत एकत्र येऊन भव्य आंदोलन केले. निळ्या झेंड्यांच्या साक्षीने आणि ‘जयभीम’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या आंबेडकरवादी कार्यकत्यांनी एकजुटीचे शक्तिप्रदर्शन करत शासनाकडे उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. या आंदोलनादरम्यान ‘उपवर्गीकरण तात्काळ रद्द करा’, ‘जाती जातीत फूट पाडू नका’, ‘संविधान वाचवा, आरक्षण वाचवा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणारे कोणतेही निर्णय स्वीकारले जाणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला. या आंदोलनात युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंबेडकरी समाजाची एकजूट आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने सामाजिक न्याय आणि संविधानिक हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी शासनाकडे केली. या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अॅड. अभयाताई सोनवणे, मुंबई प्रदेश अध्यक्षा उषाताई रामलू, उत्तर-पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्षा रेश्मा खान यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकत्यांची लक्षणीय उपस्थिती होती. या आंदोलनातून आंबेडकरवादी समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडल्याचे आयोजकांनी सांगितले.

