प्रशासन व समाजातील दुवा म्हणून पत्रकारांची भूमिका महत्त्वाची : उपवनसंरक्षक योगेश वाघाये

HomeNewsनागपुर डिवीजन

प्रशासन व समाजातील दुवा म्हणून पत्रकारांची भूमिका महत्त्वाची : उपवनसंरक्षक योगेश वाघाये

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (प्रतिनिधी) : – पत्रकार हे प्रशासन आणि समाज यांच्यातील महत्त्वाचे दुवा असून त्यांच्या समन्वयातून अनेक सामाजिक प्रश्नांना योग्य दिशा मिळते. वन्यजीव व मानव संघर्षासारख्या संवेदनशील विषयांमध्येही पत्रकार जनजागृती, संवाद आणि समन्वय साधून संघर्ष टाळण्यास मोलाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक योगेश वाघाये यांनी केले.
मध्य चांदा वन विभागाच्या वतीने वन्यजीव व मानव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना या विषयावर पत्रकारांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील कारवा वनपर्यटन केंद्राच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करत होते. कार्यशाळेत वन्यजीव व मानव संघर्षाची वाढती कारणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना, वन विभागाच्या विविध योजना तसेच वन्यजीव संवर्धनासाठी नागरिकांच्या सहभागाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. पत्रकार हे समाजाचे आरसे असून समाजातील भावना, मतप्रवाह आणि समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात. त्यामुळे वन व वन्यजीव संवर्धनाच्या कार्यात पत्रकारांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे वाघाये यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपवनसंरक्षक योगेश वाघाये होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय वन अधिकारी मंगेश गिरडकर, व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष अनिल बाळसराफ तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान पत्रकारांनी मानव-वन्यजीव संघर्षाच्या विविध पैलूंवर चर्चा केली. वन विभाग आणि नागरिकांमधील संवादातील दरी, शेतपिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यात होणारा विलंब, अवैध वृक्षतोड रोखण्याची आवश्यकता, रोपवाटिका व वृक्षलागवड प्रक्रियेतील सुधारणा आदी विषयांवर मते व्यक्त करण्यात आली. तसेच वन विभाग व प्रसारमाध्यमांमध्ये अधिक प्रभावी समन्वयासाठी प्रत्येक वनपरिक्षेत्र कार्यालयात पत्रकार समन्वय समिती स्थापन करण्याची सूचना करण्यात आली.

प्रास्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार संतोष कुंदोजवार यांनी केले तर आभार प्रदर्शन वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेखा मुरकुटे यांनी केले. कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे, किशोर गौरकार, सुरेखा मुरकुटे, आम्रपाली खोब्रागडे, राजेश घोरुडे, अनंत राखुडे, महेश दिघे यांच्यासह राजुरा, गोंडपिपरी, बल्हारशाह, वनसडी, विरूर, पोंभूर्णा आणि कोरपना येथील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेनंतर पत्रकारांना कारवा वनपर्यटन क्षेत्राची विशेष भटकंती घडवून आणण्यात आली. यावेळी अस्वल, बिबट, गवा (बायसन), मोर, चितळ आदी वन्यप्राण्यांचे दर्शन झाले. तसेच या परिसरात वाघांचा वावर असून अनेक पर्यटकांना वाघांचे दर्शन झाल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या वनभ्रमंतीमुळे पत्रकारांना वन्यजीव संवर्धन आणि वन व्यवस्थापनाची प्रत्यक्ष माहिती मिळाली.

You cannot copy content of this page