– दुचाकी चोरी व बॅटरी चोरीचे गुन्हे उघड; आरोपी जेरबंद.
गौतम नगरी चौफेर राजुरा, दि.१२ जून
राजुरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट तपास कौशल्य आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दुचाकी चोरी व बॅटरी चोरीचे दोन स्वतंत्र गुन्हे अल्पावधीत उघडकीस आणत आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, राजुरा पोलीस स्टेशन हद्दीत एका ज्युपिटर स्कुटीची चोरी आणि एका ट्रॅक्टर बॅटरीची चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या दोन्ही घटनांचा गांभीर्याने तपास करत पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला.
तपासादरम्यान पोलिसांनी साहिल राजू सटे (वय २३ वर्षे, रा. सुभाष वॉर्ड, बल्लारशाह) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरी केलेली एम.एच.-३० सीडी ०३२२ क्रमांकाची हिरव्या रंगाची ज्युपिटर स्कुटी चोरी केल्याची कबुली दिली. या वाहनाची अंदाजे किंमत ४० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच दुसऱ्या प्रकरणात रवि विजय सिंह (वय २६वर्षे, रा. आर्वी, ता. राजुरा) यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून एस.एफ. कंपनीची ट्रॅक्टर बॅटरी जप्त करण्यात आली असून तिची अंदाजे किंमत ७,५०० रुपये आहे.
या कारवाईत एकूण ४७,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हे दाखल असून पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक हेमंत नाकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुयोग नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रमपूर्वक तपास करून अल्पावधीत गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
राजुरा पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश पुन्हा एकदा नागरिकांपर्यंत पोहोचला आहे.

