– १३ विद्यार्थ्यांना अखेर प्रवेश.
– ॲड. दीपक चटप यांच्या माध्यमातून पालकांची न्यायालयीन लढाई यशस्वी.
गौतम नागरी चौफेर बादल बेले राजुरा २३ मे – चंद्रपूर जिल्ह्यातील १३ विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढलेल्या प्रकरणात उच्च न्यायालयाने निर्णायक हस्तक्षेप करत नवोदय प्रशासनाच्या मनमानीला चाप लावला होता. विद्यार्थांना अंतरिम दिलासा देत नवोदय प्रशासनाला उत्तर देण्याचे आदेशित केले होते. दरम्यान ॲड. दीपक चटप यांच्या माध्यमातून दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलोर व न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने विद्यार्थ्यांच्या बाजूने ठोस भूमिका घेत अंतरिम दिलासा दिला. या न्यायालयीन आदेशानंतर नवोदय विद्यालय समिती, नवी दिल्ली येथील उपआयुक्तांनी चंद्रपूर नवोदय विद्यालयाला स्पष्ट निर्देश देत तहसीलदारांनी दिलेल्या ग्रामीण प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे आदेश जारी केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग अखेर मोकळा झाला. गोंडपिपरी, सिंदेवाही, पोंभुर्णा, मूल व सावली या तालुक्यांतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शाळांची UDISE प्रणालीमध्ये चुकीने “Urban” अशी नोंद करण्यात आली. प्रत्यक्षात हे सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील असून त्यांच्याकडे तहसीलदारांनी दिलेली वैध ग्रामीण प्रमाणपत्रे होती. तरीदेखील नवोदय प्रशासनाने केवळ UDISE नोंदीचा आधार घेत विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखून धरले, ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. या अन्यायकारक निर्णयामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. उच्च न्यायालयाने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्यावर स्थगिती दिली व त्यांच्या हक्कांचे संरक्षण केले. न्यायालयाच्या या ठोस भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला आणि प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले. तहसीलदारांनी दिलेल्या वैध प्रमाणपत्रांना नाकारून नवोदय प्रशासनाने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घातले होते. उच्च न्यायालयाने योग्य वेळी हस्तक्षेप करत विद्यार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण केले.हा केवळ १३ विद्यार्थ्यांचा विजय नसून, न्याय आणि शिक्षणाच्या अधिकाराचा मोठा विजय आहे असे मत ॲड. दीपक चटप यांनी मांडले. आता या प्रभावी न्यायालयीन लढ्याचा आणि उपआयुक्तांनी जारी केलेल्या स्पष्ट निर्देशांचा थेट परिणाम म्हणून खालील १३ विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळणार आहे —
स्वानंदी वेदांत मेहरकुरे, परीधी वैभव अस्वले, स्वरांश संदेश गावंडे, गर्गी नितेश रास्से, शिवम किशोर टोंगळवार, आदर्श दिनकर सोनटक्के, संयम मेश्राम, स्वादीप झाडे, त्रिकाय गेडाम, समीर मंडले, तेजल वधाई, अर्पिता संतोष मोरे या विद्यार्थ्यांना आता इयत्ता १२वी पर्यंत मोफत निवासी शिक्षणाचा लाभ मिळणार असून, हा निर्णय केवळ या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर अशा प्रकारच्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.



COMMENTS