फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना आर्थिक गुन्हे शाखेचे पाचारण
गौतम नगरी चौफेर – श्रीकृष्ण देशभ्रतार मंडळ, व्यवस्थापक आणि लेखा परीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल; पुराव्यासह हजर होण्याचे आवाहन
दरम्यान :- येथील गुरुकृपा अर्बन क्रेडीट को-ऑप सोसायटी मर्या. (र.नं. ३०२) मध्ये संचालक मंडळ, शाखा व्यवस्थापक आणि लेखा परीक्षकांनी संगणमत करून २८ कोटी ३३ लाख रुपयांच्या ठेवी धोक्यात आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपास चक्रावेगाने फिरवले असून, फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आपले बयाण नोंदवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
१ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२२ या पाच वर्षांच्या कालावधीत संस्थेच्या संचालक मंडळाने, व्यवस्थापकांनी आणि लेखा परीक्षकांनी आपापसात संगणमत केले. संस्थेच्या आर्थिक व्यवहारात तब्बल १२ कोटी ३२ लाख ४६ हजार २१५ रुपयांची मोठी अनियमितता केली असून निधीचा गैरवापर केला आहे. या गैरव्यवहारामुळे संस्थेकडे जमा असलेल्या एकूण २८ कोटी ३३ लाख ५५ हजार ३५८ रुपयांच्या ठेवी आता अडचणीत आल्या आहेत.
गुन्हा दाखल आणि तपासः सहकारी संस्थेचे विशेष लेखापरीक्षक (वर्ग-२) देविचंद बालचंद राठोड यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा (अप. क्र. ३२३/२०२३) नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी दोषी संचालक, पदाधिकारी, व्यवस्थापक आणि लेखा परीक्षकांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ सह महाराष्ट्र गुंतवणूकदार हित संरक्षण अधिनियम कलम ३ आणि ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मिश्रा करत आहेत.
गुरुकृपा अर्बन क्रेडीट को-ऑप सोसायटीच्या भंडारा येथील मुख्य कार्यालयात किंवा इतर उपशाखांमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी, खातेधारकांनी किंवा ठेवीदारांनी पैसे गुंतवले आहेत आणि ज्यांची फसवणूक झाली आहे, अशा सर्वांना पोलिसांनी आवाहन केले आहे. त्यांनी या गुंतवणूकदारांनी गुंतवलेल्या पैशाचा कागदपत्रांसह आणि पुराव्यासह पोलीस अधीक्षक कार्यालय, आर्थिक गुन्हे शाखा, भंडारा येथे उपस्थित राहून आपले बयाण नोंदवावे, जेणेकरून पुढील कायदेशीर कारवाई करणे सुलभ होईल.



COMMENTS