– संमेलनातून पर्यावरण संवर्धनाचा होणार जागर.– डॉ. ओमप्रकाश गोंड
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, ६ मे
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने आयोजित पाचवे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन २०२६ दिनांक १० मे (रविवार) रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:०० या वेळेत उत्साहात पार पडणार आहे. हा भव्य कार्यक्रम जय वासुदेवानंद हॉल, आर.एस.एन. हॉटेलजवळ, उद्यमनगर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आला आहे. या संमेलनासाठी राजुरा, गडचांदूर, बल्लारपूर व चंद्रपूर येथील पर्यावरणप्रेमी मोठ्या उत्साहात रवाना झाले. राजुरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी हिरवी झेंडी दाखवत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी रस्त्यावर बसून जोडे-चप्पल शिवणाऱ्या गरजू व्यक्तींना उष्णता व पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला. कुडाळ येथे होणाऱ्या या संमेलनात पर्यावरण संवर्धन, पर्यटन विकास, हवामान बदल यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच वृक्षदिंडी, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन, पर्यावरण जनजागृती कार्यक्रम, सांस्कृतिक सादरीकरणे आणि पर्यावरणप्रेमींचा सन्मान अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या सत्रात पर्यावरण विषयक मार्गदर्शन, विशेष अतिथींची भाषणे तसेच पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
या संमेलनाचा मुख्य उद्देश पर्यटनाला चालना देणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे हा असल्याचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————–
तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रातून विशेषतः नागपूर विभाग व चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींचा मोठा सहभाग असल्याचा आनंद आहे. सामाजिक जाणीव ठेवून गरजूंना छत्र्यांचे वाटप करून संमेलनासाठी रवाना झालेल्या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाने आपले कर्तव्य ओळखून पर्यावरण संवर्धन व मानवता विकासासाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.



COMMENTS