गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे – हिंगोली जिल्ह्यातील रांजाळा तालुका औंढा गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने रांजाळेकर विकास फाउंडेशनच्या पुढाकारातून दिनांक २ मे २०२६ रोजी हनुमान मंदिराच्या आवारात ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या बैठकीत ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन काही महत्वपूर्ण निर्णय सर्वानुमते घेण्यात आले.
या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे “एक गाव – एक स्मशानभूमी” हा होय. हा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला असून, गावात एकात्मता व समतेचा संदेश देणारा ठरला आहे. यावेळी भविष्यात स्वच्छ, हरित व सर्व सुविधांनी युक्त स्मशानभूमी विकसित करण्याचा संकल्पही ग्रामस्थांनी केला.
रांजाळेकर विकास फाउंडेशनच्या माध्यमातून गावात यापूर्वीही विविध उपक्रम राबविण्यात आले असून, गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत गाव विकासाचे ‘संविधान’ तयार केले आहे. या संविधानाच्या आधारे गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये बळीराजा महोत्सव, सर्वांगसुंदर अभ्यासिका, व्यायामशाळा, क्रीडांगण, शाळा विकास आदी विविध उपक्रमांचा समावेश आहे. काही कामे यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, उर्वरित कामे आगामी काळात पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
तसेच हरितग्राम संकल्पनेअंतर्गत दिलीप भाऊ वैद्य यांच्या शेतापासून ते गावाच्या नदीपर्यंत पहिल्या टप्प्यात फुलझाडे व सावलीची झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमासाठी विशाल वैद्य, सोपान वैद्य, ज्ञानेश्वर खल्लाळ व इतर तरुणांची टीम स्थापन करण्यात आली आहे. वाढदिवस, लग्न, स्मृतिदिन अशा विविध प्रसंगी झाडे उपलब्ध करून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
याचबरोबर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मुलींची अभ्यासिका अधिक सुव्यवस्थित व प्रभावीपणे चालवण्यासाठी नियोजन करण्यात आले. विद्यार्थिनींची संख्या वाढवणे, शिस्त व शांतता राखणे तसेच त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित व्यक्तीचे मानधन लोकसहभागातून उभारण्याचे ठरविण्यात आले असून, यासाठी अनेक दाते पुढे आले आहेत. दात्यांची नावे सार्वजनिक करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
विशेष म्हणजे, गावातील सर्व घटक—ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिला—मोठ्या उत्साहाने एकत्र येत असून, गाव विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.
या ग्रामसभेस गावातील सरपंच, माजी सरपंच, ज्येष्ठ नागरिक, तरुण व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— रांजाळेकर विकास फाउंडेशन


COMMENTS