चंद्रपूरमध्ये स्थानिकांच्या हक्कासाठी निर्णायक लढा वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड विरोधात आंदोलन तीव्र

HomeNewsनागपुर डिवीजन

चंद्रपूरमध्ये स्थानिकांच्या हक्कासाठी निर्णायक लढा वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड विरोधात आंदोलन तीव्र

गौतम नगरी चौफेर आवारपूर : कोळसा संपत्तीवर उभ्या असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिकांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत स्थानिक युवक व कामगारांनी आता निर्णायक लढ्याची भूमिका घेतली आहे. वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड अंतर्गत कार्यरत कंत्राटी कंपन्यांकडून स्थानिकांना जाणीवपूर्वक रोजगारापासून वंचित ठेवले जात असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या मागण्यांमध्ये कंत्राटी कंपन्यांकडून स्थानिकांना जाणीवपूर्वक डावलणे तात्काळ थांबवणे, 80% स्थानिक रोजगाराची अंमलबजावणी करणे, अनुभवी स्थानिक कामगारांना प्राधान्य देणे, वेतन पावत्या व कायदेशीर सुविधा लागू करणे, तसेच 2020 ते 2026 दरम्यान झालेल्या अपघातांची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करणे यांचा समावेश आहे.

तसेच, कंत्राट संपल्यानंतर जुन्या कामगारांना हटवून नव्या कामगारांची भरती करण्याची प्रथा बंद करावी, आणि बाहेरील कामगारांकडून कमी वेतनात जास्त काम करून घेण्याचा प्रकार तात्काळ रोखावा, अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे. स्थानिकांच्या जमिनीवर उद्योग उभा राहतो, पण रोजगार मात्र बाहेरच्यांना हा अन्याय आता सहन केला जाणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

प्रशासनाकडून अद्याप ठोस लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, पुढील टप्प्यात अधिक आक्रमक पावले उचलण्याचा इशाराही देण्यात आला आहे. वारंवार निवेदने देऊनही वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले. नागपूर मुख्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन, तसेच चंद्रपूर ते नागपूर पदयात्रा करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. स्थानिकांच्या हक्कांवर उघड अन्याय होत असताना संबंधित यंत्रणा गप्प बसली. या निष्काळजीपणाविरोधात आणि स्थानिकांना न्याय मिळवण्यासाठी आम्हाला अखेर आमरण उपोषणाचा कठोर आणि निर्णायक मार्ग स्वीकारावा लागला आहे.

स्थानिक शेतमजूर, प्रकल्पग्रस्त कुटुंबे व बेरोजगार युवकांना डावलून बाहेरील कामगारांकडून कमी वेतनात जास्त काम करून घेतले जात असल्याचे आरोप आंदोलनकर्त्यांनी केले आहेत. शासनाच्या 80% स्थानिक रोजगाराच्या नियमाला सर्रास पायदळी तुडवले जात असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. रोशन हरबडे यांनी २० एप्रिल २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मागील चार दिवसांपासून अन्न-पाण्याचा त्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्यामुळे २३/०४/२०२६ रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र उपचारानंतर २४/०४/२०२६ रोजी पुन्हा उपोषणस्थळी परत येत त्यांनी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

जोपर्यंत स्थानिकांना न्याय मिळत नाही आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत माती व कोळसा उत्खनन करणाऱ्या कंत्राटी कंपन्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जात नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील,” असा ठाम इशारा रोशन हरबडे यांनी दिला आहे.

राजकीय नेत्यांची भेट
२५/०४/२०२६ रोजी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव चटप व दीपक चटप यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. त्यांनी प्रशासनाशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

२४/०४/२०२६ रोजी पालकमंत्र्यांच्या बैठकीतही या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून संबंधितांना 8 दिवसांत बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत कोणतेही लेखी आदेश देण्यात आले नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संताप वाढला आहे.

प्रशासनावर गंभीर आरोप
आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, प्रशासन जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असून आंदोलन दडपण्यासाठी कायद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांकडून कारवाईच्या इशाऱ्यांमुळे वातावरण अधिक तणावपूर्ण झाले आहे.

मुंडन आंदोलनाचा इशारा
लेखी आश्वासन न मिळाल्यास आंदोलनकर्त्यांनी पुढील टप्प्यात मुंडन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आले. आता हा लढा कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

एकूणच, चंद्रपूरमध्ये स्थानिक रोजगाराचा प्रश्न पेटला असून, प्रशासन आणि वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड यांच्यासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे. येत्या काही दिवसांत या आंदोलनाचा काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page