जातीचा अहंकार ठरला ‘काळ’!

HomeNewsनागपुर डिवीजन

जातीचा अहंकार ठरला ‘काळ’!

आंतरजातीय विवाहाचा सूड; जावयाचा निर्घृण खून
प्रजासत्ताक दिनीच माणुसकीचा खून — समाज हादरला
सासू, साळ्यासह पाच जणांना अटक; जातीय द्वेषाचे विदारक दर्शन

गौतम नगरी चौफेर संजीव भांबोरे तुमसर (भंडारा) : विद्या, विज्ञान आणि प्रगतीच्या गप्पा मारणाऱ्या समाजाचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. “जात संपली” असे म्हणणाऱ्यांच्या थोबाडीत मारलेली ही चपराक आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील बेटाळा गावात आंतरजातीय विवाहाचा राग मनात धरून एका तरुणाचा नियोजनबद्ध आणि अमानवीय खून करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या सकाळीच ही घटना उघडकीस आल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
आकाश शालिक शेंडे (३०) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, केवळ दीड महिन्यापूर्वी केलेल्या आंतरजातीय प्रेमविवाहाची “शिक्षा” त्याला प्राण गमावून भोगावी लागली.

विश्वासघाताचा जाळ्यात ओढून खून…
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश शेंडे याने गावातीलच एका तरुणीशी प्रेमविवाह केला होता. हा विवाह मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. मनात पेटलेला जातीय अहंकार, तथाकथित प्रतिष्ठेचा रोग आणि द्वेषाची आग दीड महिना धुमसत राहिली.
२५ जानेवारीच्या रात्री ७ वाजताच्या सुमारास आरोपी भारत मोहतुरे याने चर्चेच्या बहाण्याने आकाशला फोन करून घराबाहेर बोलावले. विश्वासाने गेलेला आकाश पुन्हा घरी परतलाच नाही.
२६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता गावाबाहेरील तलावाजवळ त्याचा छिन्नविच्छिन्न, विदारक अवस्थेतील मृतदेह आढळून आला. माणुसकीचा गळा आवळला गेल्याचा तो भीषण पुरावा होता.

जातीय द्वेषातून उभा राहिलेला कट…

पोलीस तपासात उघड झालेले वास्तव अधिकच संतापजनक आहे. आकाशला निर्जन स्थळी नेऊन सर्व आरोपींनी मिळून त्याचा गळा आवळून खून केला. मृतदेहावरील जखमा आरोपींच्या मनातील अमानवी क्रूरतेचे भयावह चित्र मांडतात.
पोटच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करून, केवळ ‘जात’ आणि ‘अब्रू’ जपण्यासाठी सासूच खुनी बनावी, ही बाब समाजाला आरसा दाखवणारी आहे.

पाच आरोपींना बेड्या; कठोर कलमांखाली गुन्हा…

या प्रकरणी फिर्यादी प्रकाश गोपीचंद शेंडे यांच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये
• सासू अंजू रमेश कुंभलकर (४३)
• साळा चेतन रमेश कुंभलकर (२२)
• भारत बाळकृष्ण मोहतुरे (२६)
• महेंद्र बकाराम बोरकर (३१)
• दिनेश उर्फ सचिन मोहन ईश्वरकर (३७)यांचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) व ३(५) अन्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे व उपनिरीक्षक राहुल चौधरी पुढील तपास करत आहेत.

प्रजासत्ताक दिनीच हे कृत्य…

ज्या संविधानाने समता, स्वातंत्र्य आणि बंधुता दिली, त्याच संविधानाचा जयघोष होत असलेल्या दिवशी जातीय द्वेषातून एका तरुणाचा खून होतो— यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती?
एकीकडे आपण मंगळावर जाण्याच्या गोष्टी करतो, तर दुसरीकडे लग्नासारख्या वैयक्तिक निर्णयासाठी आजही रक्त सांडले जाते. प्रश्न केवळ कायद्याचा नाही, तर मनातील जात संपली आहे की नाही, हा आहे.
“मुलांच्या आनंदापेक्षा जात मोठी आहे का?”हा प्रश्न आज प्रत्येक पालकाने, प्रत्येक समाजाने आणि प्रत्येक राजकीय नेतृत्वाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.ही केवळ हत्या नाही —
हा समाजाच्या माणुसकीवर झालेला घाला आहे!

COMMENTS

You cannot copy content of this page