गौतम नगरी चौफेर सौ सुवर्णा बादल बेले राजुरा – २५ डिसेंबर बल्लारशाह येथील सांस्कृतिक नाट्यगृह येथे दिनांक २३ डिसेंबर रोजी एसएनडिटी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या अंतर्गत महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारशाह उपकेंद्र यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध १६ कनिष्ठ महाविद्यालये व शाळांमधील मुलींच्या चमूंनी सहभाग नोंदवून महाराष्ट्राच्या लोककलेचे समृद्ध दर्शन घडवले. पारंपरिक वेशभूषा, तालबद्ध हालचाली आणि सुसंवादी संगीताच्या जोरावर सादर झालेल्या लोकनृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत राजुरा तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा, देवाडा येथील विद्यार्थीनींनी आपल्या दमदार व शिस्तबद्ध सादरीकरणाच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणारे नृत्य सादर करत विद्यार्थिनींनी आपली कला, आत्मविश्वास आणि संघभावना यांचे उत्तम दर्शन घडवले.

या नृत्य सादरीकरणासाठी उषा करडभुजे कला शिक्षिका यांच्या मार्गदर्शनाखाली किरण भालेराव संगणक शिक्षिका तसेच मार्गदर्शक व ज्येष्ठ व्याख्याते डॉ. अमित नाईक यांनी विद्यार्थीनींना सातत्यपूर्ण व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच हे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या रिंगणे यांनी विद्यार्थीनींचे मनापासून अभिनंदन केले. तसेच या संपूर्ण उपक्रमासाठी सहकार्य करणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांचे आभार मानले. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास होतो व त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. या यशामुळे शासकीय आश्रम शाळा देवाडा या शाळेच्या शैक्षणिक बरोबरीनेच सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याचीही दखल घेतली जात असून परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


COMMENTS