भुवया उंचावल्या; काँग्रेस खासदार व भाजप आमदारांचा एकाच वाहनातून प्रवास

HomeNewsनागपुर डिवीजन

भुवया उंचावल्या; काँग्रेस खासदार व भाजप आमदारांचा एकाच वाहनातून प्रवास

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय खलबते

गौतम नगरी चौफेर  संतोष पटकोटवार // : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी आमदार, खासदार आणि माजी मंत्र्यांनी दंड थोपटले आहे. अशातच काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि भाजपचे आमदार देवराव भोंगळे यांनी नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर एकाच वाहनातून प्रवास केल्याने पक्षभेद, मतभेद, विचारधारा बाजूला ठेवून राजकीय हालचाली जोरात सुरू असल्याचे बोलले जात आहे.

१० जुलै रोजी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक होत आहे. जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर आमदार-खासदारांचा थेट सहभाग दिसून येत आहे.

लोकप्रतिनिधी गटबांधणीत गुंतले आहे. अशातच सोमवारी काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले आणि भाजपचे आमदार देवराव भोंगळे हे एकाच वाहनातून प्रवास करताना दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून हे दोन्ही नेते एकाच वाहनातून बाहेर पडले. ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे.

खासदार धानोरकर आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यातील मतभेद लपून नाही. दुसरीकडे, आमदार बंटी भांगडिया आणि किशोर जोरगेवार हे देखील या निवडणुकीत सक्रिय असून, भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे हे दोघेही राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात. अशा पार्श्वभूमीवर मुनगंटीवार समर्थक समजले जाणारे आमदार देवराव भोंगळे आणि काँग्रेसच्या खासदार धानोरकर यांचा एकत्रित प्रवास ही निवडणूकपूर्व संभाव्य समीकरणांची नांदी आहे, अशी चर्चाही व्हायला लागली आहे. या राजकीय हालचालीमुळे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील सत्तेची समीकरणे कशी जुळवून आणली जातील, याकडे लक्ष लागले आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page