HomeNewsनागपुर डिवीजन

रोटरी क्लब राजुराच्या शेतकरी मार्गदर्शन शिबिराला ३५० हून अधिक शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.- मिरची, कापूस व तूर पिकांच्या व्यवस्थापनासह माती परीक्षण, खत व्यवस्थापन आणि बाजारपेठेबाबत मार्गदर्शन.

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१९ ऑक्टोबर यावर्षी राजुरा व कोरपना तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, उत्पादन खर्च कमी करून पिकांचे योग्य व्यवस्थापन करता यावे आणि उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून उत्पादनात वाढ साधता यावी, या उद्देशाने रोटरी क्लब राजुराच्या वतीने शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सम्राट हॉल, राजुरा येथे शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ३५० हून अधिक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरामध्ये मिरची, कापूस व तूर या प्रमुख पिकांच्या लागवडीपासून ते पीक संगोपन, खत व्यवस्थापन, फवारणीचे योग्य नियोजन, रोग व कीड नियंत्रण, माती परीक्षण तसेच बाजारपेठ व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक मुकेशकुमार यादव यांनी मिरची पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या विविध टप्प्यांची सखोल माहिती दिली. योग्य बियाण्यांची निवड, जमिनीच्या आरोग्यानुसार खतांचा वापर, पिकांचे संगोपन, फवारणीचे नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास करून शेतीचे आर्थिक नियोजन कसे करावे, याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. माती परीक्षणाचे महत्त्व विशद करताना जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता लक्षात घेऊन खतांचा संतुलित वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले.
यावेळी विनोद नागले, सतीश जाधव तसेच कृषक स्वराज संस्थेचे पदाधिकारी श्री. सतीश गिरसावळे यांनीही शेती व्यवस्थापन व आधुनिक कृषी पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले. विशेषतः मिरची पिकाच्या लागवड व व्यवस्थापनाबाबत मिळालेल्या उपयुक्त माहितीबद्दल त्यांनी मार्गदर्शकांचे आभार मानले.
कार्यक्रमाला रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष राजू गोखरे उपस्थित होते. त्यांनी मिरची, कापूस व तूर या पिकांच्या व्यवस्थापनासोबतच शेतीमध्ये योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचा अभ्यास यांचे महत्त्व पटवून दिले. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीत उपयोगी पडणारे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या अडचणींवर उपाय शोधणे ही रोटरी क्लबची सामाजिक बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी रोटरी 3030 चे असिस्टंट डिस्टिक गव्हर्नर अनुप कुमार यादव तथा प्रतिष्ठित व्यापारी व व्यक्तिमत्व असलेले राजेंद्रजी चांडक तथा क्लबचे सचिव किशोर हिंगाणे, माजी अध्यक्ष कमल बजाज, माजी अध्यक्ष निखिल चांडक, डॉ. पराग डोरलीकर, अॅड. जीवन इंगोले यांच्यासह रोटरी क्लबचे इतर सदस्य उपस्थित होते.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी माजी अध्यक्ष निखिल चांडक यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष राजू गोखरे यांनी केले. शिबिराच्या समारोपानंतर उपस्थित शेतकरी व रोटरी क्लबच्या पदाधिकारी-सदस्यांनी एकत्रित भोजनाचा लाभ घेतला. शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी आणि शेतीच्या प्रगतीसाठी रोटरी क्लब राजुराचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

You cannot copy content of this page