गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.२७ सप्टेंबर वाढदिवस म्हटला की केवळ केक कापून किंवा अनावश्यक खर्च करून साजरा करण्याऐवजी सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम जिल्हा परिषद शाळा, कडोली येथे पार पडला. कुमार प्रभात ऋषी चौथाले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासोबतच शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा सामाजिक संदेश देण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून पर्यावरणाचे जतन करण्याचा संकल्प करण्यात आला. या कार्यक्रमाला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग सचिव पंडित काळे, ऋषी चौथाले, कोरपना तालुका महिला अध्यक्षा अरुणा सालवटकर, गडचांदूर शहर महिला संघटिका मनीषा काळे, प्रियंका गुरुकर, उरकुडे मॅडम, दुर्गे सर तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगत ‘एक व्यक्ती–एक झाड’ या भावनेतून वृक्षसंवर्धन करण्याचे आवाहन केले. वाढदिवसानिमित्त केलेल्या या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. वाढदिवसाच्या आनंदाला सामाजिक कार्याची जोड देत वृक्षारोपण आणि शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आल्याने कडोली येथील हा वाढदिवस विद्यार्थ्यांसाठी तसेच पर्यावरणप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला.
