गौतम नगरी चौफेर संतोष पटकोटवार गडचांदुर, दि. 31 : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ५१ स्वच्छतादूतांच्या वेतनवाढीच्या मागणीला अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. नगरपरिषदेने सर्वानुमते निर्णय घेत महागाई दर, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींचा विचार करून स्वच्छतादूतांचे वेतन सुधारित करण्याचा निर्णय घेतला.
नगराध्यक्ष निलेश ताजने यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतादूतांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार योग्य मोबदला मिळावा आणि त्यांच्या आर्थिक स्थैर्याला आधार मिळावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

किमान वेतनाच्या अनुषंगाने निर्णय
किमान वेतन कायदा, १९४८ च्या अनुषंगाने स्वच्छतादूतांना योग्य किमान वेतन मिळावे, यासाठी वेतनवाढीचा निर्णय घेण्यात आला. शहराची स्वच्छता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छतादूतांच्या आर्थिक व सामाजिक हिताच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
वाढत्या महागाईच्या काळात ५१ स्वच्छतादूतांना मिळणाऱ्या सुधारित वेतनामुळे त्यांच्या उपजीविकेला आधार मिळण्यासोबतच आर्थिक स्थैर्य आणि जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.
नगरपरिषद पदाधिकारी, अधिकारी उपस्थित
यावेळी नगराध्यक्ष निलेश ताजने, उपनगराध्यक्ष संजय मेंढी, बांधकाम सभापती रामसेवक मोरे, पाणीपुरवठा सभापती शेख सरवर, मुख्याधिकारी आशिष चौहान, नगरसेवक महेश आवारी, चेतन शेंडे, सुरेश मेश्राम, शेख खाजा, हिमांशू नामवाड, तसेच नगरसेविका सारिका डोर्लीकर, अश्विनी कांबळे, कीर्ती वैरागडे, शीतल धोटे, शेख रजिया सुलताना शेख ख्वाजा, सपना सेलोकार, प्रणिता उपाध्ये, संगीता गाऊत्रे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
५१ स्वच्छतादूतांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीवर झालेला हा निर्णय कामगारहिताचा असून, शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज कार्यरत असलेल्या स्वच्छतादूतांच्या योगदानाची दखल घेणारा ठरला आहे.
