राखी पौर्णिमेनिमित्त स्वामी विवेकानंद अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना बांधल्या राख्या
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. २८ ऑगस्ट :वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था अंतर्गत राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समितीच्या नागपूर विभाग महिला सचिव ॲड. मेघा रामकृष्ण धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंद अनाथ आश्रम, रामपूर येथे आयोजित करण्यात आला.
यावेळी आश्रमातील विद्यार्थ्यांना विविध फळांचे वाटप करण्यात आले. तसेच राखी पौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवस आणि रक्षाबंधनाचा आनंद एकत्रितपणे विद्यार्थ्यांसोबत साजरा झाल्याने आश्रमातील वातावरण आनंदमय झाले होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, आपुलकी, बंधुभाव, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला. समाजातील वंचित घटकांप्रती आपली जबाबदारी ओळखून त्यांच्या आनंदात सहभागी होणे हीच खरी सामाजिक सेवा असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रमाला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत रक्षाबंधनाचे महत्त्व सांगितले. सण-उत्सव केवळ औपचारिक पद्धतीने साजरे न करता त्यातून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे आणि त्यांना आपलेपणाची जाणीव करून देणे हीच अशा उपक्रमांची खरी फलश्रुती असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सुनैना तांबेकर, नागपूर विभाग महिला अध्यक्षा, श्रीरंग ढोबळे, रवी बुटले, प्रतीक काकडे, डॉ. लखन अडबाले, संजीवनी धांडे, सुवर्णा बेले, दुर्वा बेले, ओवी बेले यांच्यासह संस्था व समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आश्रमातील विद्यार्थी उपस्थित होते. ॲड. मेघा धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने समाजातील गरजू विद्यार्थ्यांसोबत आनंद वाटून घेण्याची ही कृती सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण करणारी ठरली.

