खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्रकारांबाबत अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध व्हाॅईस ऑफ मिडियाचे राजुरा येथे धरणे व निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी

HomeNewsनागपुर डिवीजन

खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्रकारांबाबत अपमानास्पद वक्तव्याचा तीव्र निषेध व्हाॅईस ऑफ मिडियाचे राजुरा येथे धरणे व निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी

गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, जिल्हा चंद्रपूर – खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत अत्यंत अपमानास्पद वक्तव्य करून धमक्या दिल्या प्रकरणी व्हाॅईस ऑफ मिडीयाच्या वतीने राजुरा येथे संविधान चौक येथे धरणे देऊन त्यांचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी खासदार संजय पाटील यांचेवर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन राजुरा तहसिलदार ओमप्रकाश गोंड व ठाणेदार नितीन चिंचोळकर यांना देण्यात आले.
सर्वप्रथम संविधान चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून आंदोलनाला सुरूवात झाली. पत्रकारांनी घोषणा देऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात व्हॉईस ऑफ मीडियाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अनिल बाळसराफ, डाॅ.उमाकांत धोटे, राजुरा तालुकाध्यक्ष गणेश बेले, बि. यु. बोर्डेवार, एजाज अहमद, बादल बेले, अनंत डोंगे, एम.के.सेलोटे, अमोल राऊत, बाबा बेग, जाकिर सैय्यद, वसंत पोटे, शाहनवाज कुरेशी, सागर भटपल्लीवार, संतोष कुंदोजवार, सुनिल रामटेके, राकेश कलीगुरवार, अंकुश भोंगळे इत्यादी व्हाॅईस ऑफ मिडीया, राजुरा तालुका पत्रकार संघ, राजुरा पत्रकार असोसिएशन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. पत्रकार समाजातील विविध प्रश्न, जनतेच्या समस्या, भ्रष्टाचार, अन्याय माध्यमांतून शासन, प्रशासन व जनता यांचेपुढे मांडत असतो. खासदार संजय (दिना) पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेले अपमानास्पद, अवमानकारक व असभ्य वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असून संपूर्ण पत्रकार बांधवांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचविणारे आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखत संयमित भाषा वापरणे अपेक्षित असते. मात्र, अशा प्रकारच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे पत्रकारांविषयी समाजात चुकीचा संदेश जात असून त्यांच्या सुरक्षिततेवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले, धमक्या व दबावाच्या घटना वाढत असताना अशा प्रकारची विधाने अधिकच धोकादायक ठरू शकतात. लोकशाही व्यवस्थेत टीका स्वीकारण्याची मानसिकता असणे आवश्यक आहे. पत्रकारांनी विचारलेले प्रश्न किंवा बातम्या न पटल्यास त्याला कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे. पत्रकारांचा अवमान करणे, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे किंवा त्यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणे हे कोणत्याही परिस्थितीत अमान्य आहे.

व्हाॅईस ऑफ मिडीयाने दिलेल्या निवेदनात खासदार संजय (दिना) पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा शासनाने अधिकृतपणे निषेध नोंदवावा, संबंधित वक्तव्याची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ योग्य कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, खासदारांनी राज्यातील तसेच देशभरातील पत्रकारांची जाहीर व बिनशर्त माफी मागावी, पत्रकारांच्या सन्मान व सुरक्षिततेस बाधा आणणाऱ्या अशा वक्तव्यांविरोधात शासनाने कठोर भूमिका घ्यावी व भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सदर निवेदनाच्या प्रतिलिपी मा. मुख्यमंत्री,गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत.

You cannot copy content of this page