गौतम नगरी चौफेर – रजुरा भारत सरकारच्या जनगणना २०२७ अंतर्गत पहिल्या टप्प्यातील घरमोजणीचे काम नियोजित मुदतीपूर्वी टक्के १०० यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रगणक बादल बेले यांना विशेष गौरविण्यात आले. राजुरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी विवेक भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सध्याच्या तीव्र उन्हाचा तडाखा, वाढते तापमान आणि क्षेत्रीय पातळीवरील विविध अडचणींचा सामना करत प्रगणक बादल बेले यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. घराघरांमध्ये जाऊन अचूक माहिती संकलित करण्याचे कार्य त्यांनी अत्यंत समर्पणाने पूर्ण केले. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे आणि परिश्रमामुळेच घरमोजणीचे काम दिलेल्या वेळेच्या आधी १०० टक्के पूर्ण ति होण्यास मोठी मदत झाली, अशी कौतुकाची थाप प्रशासनाने त्यांच्यावर टाकली. याप्रसंगी बोलताना मुख्याधिकारी विवेक चौधरी यांनी सांगितले की, जनगणना हे देशाच्या भविष्यकालीन आणि विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य आहे. अशा राष्ट्रीय कामात प्रगणकांनी दाखवलेली मेहनत आणि सेवाभावी वृत्ती कौतुकास्पद आहे. पुढील टप्प्यांमध्येही सर्व प्रगणक याच उत्साहाने आणि जबाबदारीने कार्य करतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रशस्तीपत्र स्वीकारल्यानंतर प्रगणक बादल बेले यांनी नगर परिषद प्रशासनाचे आभार मानले. तसेच, मेळ माहिती गोळा करताना आणि हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडताना ज्या नागरिकांनी सकारात्मक सहकार्य केले, त्या सर्व नागरिकांचे त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.

घर मोजणी टप्प्याचे शंभर टक्के काम नियोजित मुदतीपूर्वी पूर्ण केल्याबद्दल मुख्याधिकारी नगरपरिषद राजुरा विवेक भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारताना प्रगनक बादल बेले.
