काळा दिवस पाळत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
गौतम नगरी चौफेर बादल बेले चंद्रपूर, दि. ३१ ऑक्टोबर जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघर्ष कृती समितीच्या वतीने शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) काळा दिवस निषेध आंदोलन करण्यात आले. यानिमित्त गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतील हजारो अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होत जुनी पेन्शनच्या मागणीला जोरदार समर्थन दिले.

दि. ३१ ऑक्टोबर २००५ रोजी शासनाने जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आणि १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू केली. या निर्णयामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे आर्थिक भविष्य अनिश्चित झाले आहे. या घटनेला २१ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी काळा दिवस पाळून शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदविला. सन २०१५ पासून विविध आंदोलनांच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही या मागणीची पूर्णतः पूर्तता झालेली नाही. त्यामुळे १९८२/८४ ची जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना पूर्ववत लागू करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चाला शिक्षक आमदार मा. सुधाकर अडबाले यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्याला त्यांनी पाठिंबा दर्शविला. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत त्यांनी आपले विचार मांडले. या आंदोलनाच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूरचे अध्यक्ष, सचिव, जिल्हा पदाधिकारी, विविध विभागांचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, सचिव, कार्यकारिणी सदस्य तसेच पेन्शन शिलेदार यांनी विशेष परिश्रम घेतले. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघर्ष कृती समितीच्या समन्वय समितीतील चंद्रपूर जिल्हा, तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला.
जुनी पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा हक्क असून, तो मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार या मोर्चातून कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.


