– हेक्टरी एक लाख रुपये मदतीची मागणी; १५ दिवसांत निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, १९ ऑक्टोबर
महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटात असताना शासनाने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची अग्रिम मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा असल्याचा घणाघाती आरोप शेतकरी संघटनेने केला. या तुटपुंज्या मदतीचा निषेध नोंदवण्यासाठी सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता तहसील कार्यालय, कोरपना येथे मुख्यमंत्री यांच्या नावे पाच हजार रुपयांचा धनादेश व विविध मागण्यांचे निवेदन पाठवून भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. पीकनुकसान, वाढता उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा आणि पाणीटंचाईमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत हेक्टरी एक लाखांची मदत देण्याऐवजी केवळ पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर करणे अन्यायकारक असल्याची भूमिका संघटनेने मांडली. अनेक पात्र शेतकरी अद्याप कर्जमुक्तीच्या लाभापासून वंचित असून, नमो किसान योजनेचे दोन हप्तेही प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक गंभीर झाल्या आहेत.

शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या दुष्काळग्रस्त व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख आर्थिक मदत देणे, पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देणे, नमो किसान योजनेचे प्रलंबित हप्ते तातडीने वितरित करणे, शेतकऱ्यांचे वीज-पाणी कनेक्शन खंडित न करणे, जनावरांसाठी चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, महसुली जमिनीवर तीस वर्षांपेक्षा अधिक काळ शेती करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार पट्टे देणे, स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देणे आणि कंत्राटदारांची प्रलंबित देयके अदा करणे या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
१५ दिवसांची मुदत; अन्यथा दिवाळीपूर्वी राज्यव्यापी आंदोलन
निवेदन प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत मागण्यांवर ठोस व सकारात्मक निर्णय न झाल्यास दिवाळीपूर्वी महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला. शेतकऱ्यांना केवळ तात्पुरत्या मदतीची नव्हे, तर त्यांच्या नुकसानीच्या तुलनेत पुरेशा आर्थिक आधाराची गरज आहे. शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी संघटनेने केली.

माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दीपक चटप, जिल्हाध्यक्ष अरुण नवले, स्वभाप जिल्हाध्यक्ष निळकंठ कोरांगे, ज्येष्ठ नेते रमाकांत मालेकर, तालुकाध्यक्ष श्रीनिवास मुसळे, युवा आघाडी अध्यक्ष नरेश सातपुते, आशिष मुसळे, गणपत काळे, सरपंच विजय धानोरकर, रत्नाकर चटप, बंडू राजूरकर, जगन्नाथ पिदुरकर, शारीक सय्यद, गणेश तुराणकर, सुनील आमने, विकास देवाळकर, मंगेश आगलावे, कैलास कोरांगे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
