– राजुरा तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत घेतला उत्स्फूर्त सहभाग.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. ८ सप्टेंबर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरा तालुका क्रीडा समितीच्या वतीने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध शाळांतील विद्यार्थी आपले क्रीडा कौशल्य पणाला लावत आहेत. तालुकास्तरीय स्पर्धेअंतर्गत १४, १७ व १९ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी स्पर्धा तालुका क्रीडा संकुल, राजुरा येथे, तर मुला-मुलींच्या सर्व वयोगटातील व्हॉलिबॉल स्पर्धा इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक स्कूल, राजुरा येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. दरम्यान राजुरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद वळीव व केंद्रप्रमुख विशाल शिंपी यांनी या शालेय क्रीडा स्पर्धांना भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. प्रथम त्यांनी कबड्डीच्या मैदानाला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

त्यानंतर व्हॉलिबॉलचे सामने पाहण्यासाठी ते मैदानावर पोहोचले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी प्रमोद वळीव हे स्वतः व्हॉलिबॉलच्या मैदानात उतरले आणि विद्यार्थ्यांसोबत व्हॉलिबॉल खेळत सहभाग नोंदविला. शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष मैदानात उतरून खेळत असल्याचे पाहून उपस्थित विद्यार्थी व क्रीडा शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी बोलताना प्रमोद वळीव यांनी सांगितले की, “माझ्या शैक्षणिक जीवनात व्हॉलिबॉल हा माझा आवडता खेळ होता. मी शालेय जीवनात नियमितपणे व्हॉलिबॉल खेळायचो. आणि आताही वेळ मिळाला तर आवर्जून खेळतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडेलाही महत्त्व आहे. क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी प्रगती करावी. शासकीय नोकऱ्यांमध्येही गुणवंत खेळाडूंना प्राधान्य मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत क्रीडाक्षेत्रातही आपले भविष्य घडवावे,” असे आवाहन त्यांनी केले. गटशिक्षणाधिकारी यांनी स्वतः खेळात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविल्याने उपस्थित विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला. अधिकारी आणि विद्यार्थी यांच्यातील हा मैदानावरील संवाद क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणारा ठरला.

यावेळी राजुरा तालुका क्रीडा संयोजक हरिश्चंद्र विरूटकर, भास्कर फरकाडे, किशोर चिंचोलकर, बादल बेले, मधुकर पाकमोडे, राजू डाहुले, प्रभाकर साळवे, हर्षल क्षीरसागर यांच्यासह विविध शाळांचे क्रीडा शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळत असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती विकसित होण्यास मोठी मदत होत आहे.

