– वृक्ष प्राधिकरण सदस्य बादल बेले यांचे काम तात्काळ स्थगित करण्याची मागणी.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि. ४ सप्टेंबर राजुरा शहरातील मुख्य हायवे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गट्टू/पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू असून, या कामासाठी मोठ्या मशिनरीच्या सहाय्याने झाडांच्या अगदी जवळ तसेच झाडांच्या मुळांच्या परिसरात खोदकाम केले जात असल्याने झाडांच्या मुळांना मोठ्या प्रमाणात इजा पोहोचत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य तथा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल एन. बेले यांनी नगर परिषद राजुरा येथील वृक्ष प्राधिकरण समितीच्या मुख्याधिकारी तथा अध्यक्षांकडे तातडीचे निवेदन देत सदर कामाला कायदेशीर आक्षेप घेतला आहे. निवेदनानुसार, पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी करण्यात येणाऱ्या खोदकामामुळे अस्तित्वातील झाडांच्या मुळांना नुकसान होत असून काही ठिकाणी झाडांच्या मुळांवरच गट्टू/पेव्हर ब्लॉक बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. मुळांना अशा प्रकारे इजा झाल्यास झाडे कमकुवत होऊन वादळ किंवा पावसाळ्यात उन्मळून पडण्याची तसेच कालांतराने सुकण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा विषय केवळ रस्ता सुशोभीकरणापुरता मर्यादित नसून शहरी वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर बाब असल्याचे बेले यांनी नमूद केले आहे.

बेले यांनी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ अंतर्गत संबंधित कामाची तपासणी करण्याची मागणी केली आहे. झाडांना इजा पोहोचविणारे खोदकाम तात्काळ थांबवावे, संबंधित कामासाठी वृक्ष प्राधिकरणाची परवानगी किंवा ना-हरकत आहे अथवा नाही याची तपासणी करावी, तसेच संबंधित रस्ता विभाग किंवा कंत्राटदाराने मंजूर केलेले नकाशे, अंदाजपत्रक, वर्क ऑर्डर, तांत्रिक मंजुरी व इतर परवानग्यांची पडताळणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच कामामुळे बाधित होणाऱ्या प्रत्येक झाडाचा वृक्ष प्राधिकरण अथवा वृक्ष अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त पंचनामा व छायाचित्रण करून, मुळांना झालेल्या नुकसानीची तांत्रिक पाहणी करावी आणि त्याचा अहवाल तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. झाडांच्या बुंध्याभोवती व मुळांच्या परिसरात आवश्यक मोकळी जागा आणि पाणी झिरपण्यासाठी जागा ठेवूनच पेव्हर ब्लॉक बसविण्याची सुधारित पद्धत अवलंबावी, असेही निवेदनात सुचविण्यात आले आहे.
नुकसान झालेल्या झाडांवर आवश्यक उपचारात्मक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. निष्काळजीपणामुळे एखादे झाड सुकले, पडले किंवा नष्ट झाले तर संबंधितांवर महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ मधील लागू तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सदर प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत झाडांच्या मुळांच्या परिसरातील काम तात्काळ स्थगित करावे, तसेच केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल वृक्ष प्राधिकरण सदस्य म्हणून उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बादल बेले यांनी केली आहे. अन्यथा संबंधित झाडांना नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंत्राटदार, विभागीय अधिकारी आणि कामास परवानगी देणारे सक्षम अधिकारी यांची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना मेल द्वारे तर उपविभागीय अधिकारी, राजुरा, तहसीलदार, राजुरा; उपविभागीय अभियंता, सा.बां.वि., राजुरा ,आणि महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

