राजुरा पोलिसांची धडक कारवाई : सात चोरीच्या दुचाकींसह दोन आरोपी जेरबंद.

HomeNewsनागपुर डिवीजन

राजुरा पोलिसांची धडक कारवाई : सात चोरीच्या दुचाकींसह दोन आरोपी जेरबंद.

– २.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा
, दि. २७ जून राजुरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून एकूण सात चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत २ लाख ६३ हजार रुपये आहे. या कारवाईमुळे राजुरा, रामनगर, कोरपना तसेच तेलंगणातील वाकडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विश्वास प्रीतमचंद आहुजा (वय ५५) यांनी २५ जून २०२६ रोजी राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मालकीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस ही दुचाकी २२ जून रोजी राजुरा तहसील कार्यालयासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७२/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे साहिल वसंत टेकाम (वय २०, इंदिरानगर, चुनाळा) आणि चेतन दिनेश मिलमिले (वय २१, इंदिरानगर, चुनाळा) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वाहनचोरीची कबुली दिली.
आरोपींकडून विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या सात हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी जप्त करण्यात आल्या. जप्त वाहनांपैकी काही वाहने राजुरा, रामनगर, कोरपना तसेच तेलंगणातील वाकडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक इंद्रकांत काकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत अल्पावधीत मोठा मुद्देमाल जप्त केल्याबद्दल राजुरा पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page