– बीड-मुंबई लॉंग मार्चप्रश्नी सरकारने मध्यस्थी करावी;
– १५ जूनला अहिल्यानगरात भव्य स्वागताचे आवाहन- सुरेश बनसोडे.
गौतम नगरी चौफेर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बीड ते मंत्रालय, मुंबई असा निघालेल्या लॉंग मार्चच्या पार्श्वभूमीवर समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी लॉंग मार्च स्वागत समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक सुरेश बनसोडे, ज्येष्ठ आंबेडकरी नेते अशोक गायकवाड, सुमेध गायकवाड, निवृत्ती आरु, अमित काळे, प्रा. जयंत गायकवाड, एन एम पवळे, विशाल गायकवाड प्रा भिमराव पगारे , सिद्धार्थ राजगुरु यांच्यासह आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुरेश बनसोडे यांनी सांगितले की, बीड ते मुंबई निघालेल्या लॉंग मार्चबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे करण्यात आली. तसेच या आंदोलनाबाबत शासनाने मध्यस्थी करून आंदोलनकर्ते व शासन यांच्यात सकारात्मक संवाद घडवून आणावा, अशीही मागणी करण्यात आली.
यावर मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले की, २०२६ ची जनगणना पूर्ण होईपर्यंत अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आली असून, याबाबत शासनाची भूमिका स्पष्ट आहे. तसेच आंदोलनाच्या आयोजकांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुढे बोलताना सुरेश बनसोडे म्हणाले की, उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यभरातून एक लाखांहून अधिक हरकती प्राप्त झालेल्या आहेत. या सर्व हरकतींचा विचार करून संबंधितांचे म्हणणे शासनापर्यंत पोहोचविण्यात आले आहे. आंदोलनकर्ते आणि राज्य सरकार यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, बीड ते मुंबई लॉंग मार्च १५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता अहिल्यानगर शहरात दाखल होणार असून, चांदणी चौक येथे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. तसेच मार्केट यार्ड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सभेचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेश बनसोडे यांनी केले आहे.

