४५ अंशांवर पारा रणरणते उन्ह

HomeNewsनागपुर डिवीजन

४५ अंशांवर पारा रणरणते उन्ह

श्रीकृष्ण देशभ्रतार “गौतम नगरी चौफेर”भंडारा/तुमसर :- प्रचंड उष्णतेच्या लाटेत नागरिक आधीच हैराण असताना, त्यातच वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे तुमसर शहरातील नागरिकांचे जीवन अक्षरश विस्कळीत झाले आहे.

तब्बल ४५ अंश सेल्सिअस तापमानात दररोज चार ते सहा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळीसुद्धा कोणतीही पूर्वसूचना न देता वीज बंद केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शहरातील अनेक भागांमध्ये नागरिक सध्या या समस्येने त्रस्त असून, लहान मुले, वृद्ध नागरिक आणि आजारी व्यक्तींना सर्वाधिक फटका बसत आहे. दिवसभर उकाड्याने जीव हैराण होत असताना पंखे, कूलर आणि पाण्याच्या मोटारी बंद पडत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. गृहिणींची दैनंदिन कामे विस्कळीत होत असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत असल्याची तक्रार पुढे येत आहे.

अधिकृत सूचना देत नसल्याची तक्रार नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपासून शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कधी दिवसा तर कधी मध्यरात्री तासनतास वीज गायब राहत असल्याने लोकांचा संताप अनावर होत आहे. अनेकदा डीपी दुरुस्ती किंवा तांत्रिक कारणांच्या नावाखाली वीज बंद केली जाते, मात्र त्याबाबत नागरिकांना कोणतीही अधिकृत सूचना दिली जात नसल्याने महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

थकबाकीदारांवर दबाव

एकीकडे महावितरणकडून थकबाकीदार ग्राहकांच्या घरी जाऊन बिल भरण्यासाठी दबाव टाकला जातो, तर दुसरीकडे नियमित बिल भरणाऱ्या ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळत नसल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे. ‘बिल वेळेवर भरूनही आम्हालाच त्रास सहन करावा लागत आहे,’ अशी नाराजी अनेक नागरिकांनी व्यक्त केली. विशेषतः खापाटोली परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. दहा ते पंधरा हजार नागरिकांना याचा फटका बसत असून, कोणतीही पूर्वकल्पना न देता तासनतास वीज बंद केली जात असल्याने संताप वाढत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

नागरिकांमध्ये नाराजी दरम्यान, या गंभीर प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका देखील चर्चेचा विषय ठरत आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असताना आणि नागरिक त्रस्त असतानाही लोकप्रतिनिधींकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. निवडणुकीत आश्वासने देणारे नेते आता कुठे आहेत, असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करीत आहेत. आता महावितरण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देतात की पुन्हा एकदा नागरिकांच्या संतापाकडे दुर्लक्ष करतात, याकडे संपूर्ण तुमसरकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS

You cannot copy content of this page