गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, २ मे – सास्ती कॉलरी कोयला खदान कर्मचारी सहकारी पतसंस्था प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या आरोपींना न्यायालयाने मोठा धक्का दिला असून त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
चंद्रपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने (दि. २ मे २०२६ ) हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या प्रकरणात सलीम रसूल शेख व इतर सहा जणांविरुद्ध राजुरा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०९/२०२६ अंतर्गत भादंवि कलम ४०६, ४०८, ४२०, ४६७, ४६८, ४७१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे. तक्रारीनुसार, २०२२ ते २०२४ या कालावधीत संस्थेचे पदाधिकारी असताना आरोपींनी नियमबाह्य पद्धतीने संस्थेचे सदस्य नसलेल्या व्यक्तींना कर्ज वाटप केले. यामुळे सुमारे ३२ लाख ९ हजार ५१४ रुपयांचा अपहार झाल्याचे लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपींच्या वतीने न्यायालयात मांडण्यात आले की, त्यांनी कोणताही गैरप्रकार केलेला नसून कर्जधारकांकडून नियमित परतफेड सुरू आहे. तसेच ते वेकोलीत कार्यरत असल्याने फरार होण्याची शक्यता नाही, असा युक्तिवाद करण्यात आला
मात्र, सरकारी पक्षाने या युक्तिवादाला विरोध करत तपास अद्याप सुरू असून बनावट कागदपत्रे व अपहाराची रक्कम हस्तगत करणे बाकी असल्याचे सांगितले. आरोपींना जामीन दिल्यास पुराव्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही न्यायालयासमोर मांडण्यात आले. न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले की, हा प्रकार गंभीर आर्थिक गुन्ह्यांत मोडणारा असून संस्थेच्या सदस्यांच्या निधीचा अपहार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. त्यामुळे तपास प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो, या कारणास्तव अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला.
यामुळे संबंधित आरोपींना दिलासा न मिळाल्याने तपास यंत्रणेला पुढील कारवाईसाठी मोकळा मार्ग मिळाला आहे.आता यापुढे पोलिस नेमकी कोणती व कशी कारवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


COMMENTS