– विविध १६ मागण्यांवर नगराध्यक्षांचा सकारात्मक प्रतिसाद.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा (ता.प्र.) :– राजुरा शहरातील पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, पाणी व्यवस्थापन , प्लास्टिक बंदी व नागरिक सुविधांबाबत विविध मागण्यांसाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अरुण धोटे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनातील मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले.
संस्थेच्या वतीने शहरातील ५० ते ७० वर्षांपेक्षा जुने वृक्ष ‘हेरिटेज ट्री’ प्राचीन वृक्ष दर्जा म्हणून घोषित करून त्यांचे संरक्षण करणे, वृक्ष करातून वृक्षलागवड व संगोपनासाठी निधी वापरणे, विविध गार्डन समित्यांसाठी ‘पर्यावरण मित्र’ पुरस्कार सुरू करणे, तसेच सोमनाथपूर येथील नगरपरिषद शाळेच्या जागेवर बचत गटातील महिलांसाठी प्रदर्शनी-विक्री गाळे व पार्किंग व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय मालमत्ता कर थकबाकीदारांची यादी जाहीर करणे, सोनिया नगर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसरातील गार्डनचे सुशोभीकरण करणे, शहरात पाण्याचा अपव्य टाळून समसमान पाणी वितरण प्रणाली राबवणे, प्लास्टिक व ई-कचरा संकलन केंद्र उभारणे, झाडांवर व विद्युत खांबांवर बॅनर-फ्लेक्स लावण्यास बंदी घालणे, निर्माल्य कलश उभारणे, वृक्ष प्राधिकरण समितीच्या नियमित सभा घेणे, सिग्नल व सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, बंद बोअरवेल दुरुस्त करणे, शहरातील जड वाहनांच्या प्रवेशासाठी वेळ निश्चित करणे तसेच कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबवण्याच्या मागण्याही करण्यात आल्या.
यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, ॲड. शंतनु देशमुख, श्रीरंग ढोबळे, रवी बुटले, मिलिंद गड्डमवार, सुनील रामटेके, मंदा सातपुते, बबिता कांबळे, अभय बोबाटे, संतोष देरकर, मुकेश सातपुते, व्यापारी असोसिएशन राजुरा अध्यक्ष संदीप जैन, पत्रकार आनंद चलाख आदी उपस्थित होते.



COMMENTS