गौतम नगरी चौफेर (संजीव भांबोरे भंडारा) – वैनगंगा नदीच्या काठावर रुयाळ (सिंदपुरी) येथे येत्या ८ फेब्रुवारीला होवू घातलेल्या आंतरराष्ट्रीय धम्मोत्सव व महासमाधी महाविहाराच्या वर्धापन दिनानिमित्त आढावा बैठक संपन्न झाली असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.
पय्या मेत्ता संघाने वैनगंगा नदीच्या काठावरील रुयाळ सिंदपुरी, ता-पवनी, जिल्हा- भंडारा येथे तयार केलेल्या जापानी पॅगोडा शैलीतील महासमाधी महाविहाराचा १९ वा वर्धापन दिन व महासमाधी भूमी चा ३९ वा आंतरराष्ट्रीय धम्मोत्सव येत्या ८ फेब्रुवारीला भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असून धम्मदूत भदंत संघरत्न मानके यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक आढावा बैठक संपन्न झाली.
१९८२ पासून पय्या मेत्ता संघ बौद्ध शिकवणींच्या आधारे महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, तामिळनाडू आणि इतर भागात मानवतावादी दृष्टिकोनातून सामाजिक, शैक्षणिक , सांस्कृतिक आणि धार्मिक कार्य करत आहे. याचाच एक भाग म्हणून, भंडारा जिल्ह्यातील रूयाळ सिंदपूरी येथे महासमाधी भूमी महाविहार २००७ मध्ये बांधण्यात आले आहे .

पय्या मेत्ता संघ जनतेच्या आणि सर्व प्राणीमात्राच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांतीसाठी काम करतो. त्या दृष्टीने पय्या मेत्ता संघाने रूयाड गावात १२,००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेले ५० फूट उंच जपानी शैलीचे महाविहार बांधले. त्यात तथागत गौतम बुद्धांची १५ फूट उंचीची मूर्ती आणि जपानच्या १२०० वर्ष जुन्या तेंदाई संघाचे बोधिसत्त्व देंग्योदायशी साइच्यो व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ फूट उंच ग्रॅनाइटच्या मूर्ती बसवल्या. १९८७ पासून दरवर्षी ८ फेब्रुवारी रोजी धम्मोत्सवाचे आयोजन केले जाते.त्यामध्ये बौद्ध धर्माचे लाखो भाविक लोक व इतर धर्मांचे हजारों लोक उपस्थित राहतात.त्यामुळे या कार्यक्रमाला धम्म यात्रेचे स्वरूप असते.
यावर्षी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय धम्मोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन जापानचे भदंत खोशो तानी हे करणार असून अध्यक्ष स्थानी धम्मदूत आचार्य भदंत संघरत्न मानके हे राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून जापान चे भदंत शोझेन आराही, भदंत शोताई योकोयामा,भदंत जोखां ओना,भदंत तेराशिमा,भदंत लोमझान तेंपा, भदंत डॉ धम्मरतन, भदंत डॉ मेत्तानंद, भदंत डॉ धर्मशील, भदंत देवानंद हे राहणार आहेत. तसेच सोबतीला खासदार डॉ प्रशांत पडोळे, आमदार डॉ परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार नाना पटोले, आमदार राजकुमार बडोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संदिप गजभिये, जिल्हाधिकारी सावन कुमार, पोलिस अधीक्षक डॉ नरूल हसन, नगराध्यक्षा डॉ विजया नंदूरकर, सरपंच विभा पचारे, विजय मानापूरे,मोहन पंचभाई हे देखील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवनी नगरीत प्रवेश करणाऱ्या सर्व जापानी, भारतीय,थाई व तिबेटच्या भिख्खू संघाचे पवनीतील बौद्ध जनते तर्फ जवाहर गेटवर स्वागत करण्यात येणार असून वाजत गाजत भव्य मिरवणूक व धम्म ध्वज रॅली काढण्यात येणार आहे.तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.तसेच त्याठिकाणी भदंत संघरत्न मानके यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात येणार असून ते त्रिशरण पंचशील देणार आहेत.त्यानंतर ही मिरवणूक सिंदपूरी रूयाड येथील महासमाधी स्तुपापर्यत वाजत गाजत जाणार आहे.
या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन भदंत संघरत्न मानके,भदंत धम्म शिखर, जेष्ठ विधीज्ञ व सामाजिक कार्यकर्ते ॲड महेंद्र गोस्वामी, अरूण गोंडाणे, कैलास गेडाम, मनोज शेंडे, मनोज बनसोड, भीमराव वानखेडे, डॉ सुनील जिवनतारे, बंडू रामटेके, अरविंद धारगांवे, नरेंद्र रामटेके, नरेंद्र अंबादे, भक्तराज गजभिये, डॉ प्रविण थूल,धनंजय तिरपुडे,सुदेश वैद्य,असित बागडे, रूपचंद रामटेके, कांताबाई दहिवले,सोनू रंगारी, दिनेश गजभिये,लोमेश सुर्यवंशी,संजय घोडके यांनी केले आहे.


COMMENTS