– प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मांडली पत्रकार परिषदेत कैफियत.
– रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा दिला इशारा.
नगरी चौफेर बादल बेले राजुरा, २१ ऑगस्ट बाबूपेठ-सास्ती नवीन रेल्वे मार्गासाठी कढोली (बुज.), मानोली (बुज.) आणि गोवरी परिसरातील सुपीक शेतजमिनींचे भूसंपादन सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांना बाजारभावाच्या तुलनेत अत्यल्प मोबदला देण्याचा आरोप प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला असून, यामुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे.

रेल्वे मार्गासाठी ९ जुलै २०२५ रोजी भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाने निश्चित केलेला दर अत्यल्प असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी सध्याच्या बाजारभावानुसार योग्य मोबदला देण्याची मागणी केली आहे.
भूसंपादन व जमिनीच्या मोजणीला विरोध केल्यानंतर २७ जुलै २०२६ रोजी राजुरा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. मोजणीनंतर योग्य दर देण्याचे आश्वासन मिळाले असले तरी प्रत्यक्षात कमी दर कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे.
रेल्वे मार्गासाठी जमीन संपादन करायचे असेल तर WCL (वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड) मार्फतच जमीन अधिग्रहण करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. तसेच योग्य मोबदला मिळाल्याशिवाय जमीन देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
न्याय्य मोबदला न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. याबाबत खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार देवराव भोंगळे आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्याकडेही निवेदन देण्यात आले आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने योग्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पत्रकार परिषदेत जितेंद्र बोबडे, रमेश कुडे, राजेंद्र बोबडे, विठोबा हिंगाने , खुशाल अडवे, राकेश हिंगाने, विनोद आस्वले, देवराव हिंगाणे, महादेव आसूटकर, लक्ष्मण आगलावे, विलास वाघमारे, रमेश अडवे, किशोर हिंगाणे ,अभय वैद्य , अक्षय बोबडे यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
