गटशिक्षणाधिकारी प्रमोद वळीव यांनी घेतला आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष वर्ग!

HomeNewsनागपुर डिवीजन

गटशिक्षणाधिकारी प्रमोद वळीव यांनी घेतला आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष वर्ग!

प्रश्नोत्तरांतून अभ्यासातील अडचणींचे निराकरण; विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रेरणादायी उपक्रम.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा,
दि. २५ ऑक्टोबर पंचायत समिती राजुरा येथील गटशिक्षणाधिकारी प्रमोद वळीव यांनी एका कार्यक्रमानिमित्त आदर्श शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी केवळ कार्यक्रमापुरती उपस्थिती न लावता थेट इयत्ता आठवी ते दहावीच्या वर्गखोल्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी मुक्तसंवाद साधला. हातात खडू घेऊन फळ्यावर अभ्यासक्रमातील महत्त्वपूर्ण बाबी समजावून सांगत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष वर्ग घेतला. एका वरिष्ठ गटशिक्षणाधिकाऱ्याने विद्यार्थ्यांमध्ये मिसळून अध्यापन केल्याने शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले. या संवादादरम्यान वळीव यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पातळी जाणून घेतली. अभ्यासक्रमातील महत्त्वाच्या घटकांवर चर्चा करताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीही समजून घेतल्या. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या शंकांचे निरसन करण्याबरोबरच संबंधित शिक्षकांसमोर त्यांच्या अडचणी मांडून त्यावर योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासातील संकल्पना अधिक स्पष्ट होण्यास मदत झाली, तर शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी समजून घेण्याची संधी मिळाली. अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष अध्यापनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. एखादा अधिकारी प्रत्यक्ष वर्गात येऊन शिकवतो, विद्यार्थ्यांशी संवाद साधतो आणि त्यांच्या शंकांचे निरसन करतो, ही बाब विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. अभ्यासात सातत्य ठेवून अधिकाऱ्यांच्या अपेक्षांप्रमाणे प्रगती साधण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रमोद वळीव यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता स्वतःमधील कौशल्ये आणि सुप्त गुण ओळखून त्यांना वाव देण्याचे आवाहन केले. जीवनाला नवी दिशा देण्यासाठी जिद्द, मेहनत आणि सातत्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आई-वडील आपल्या भविष्यासाठी घेत असलेल्या कष्टांची जाणीव ठेवून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी शाळेसह देशाचे नाव उज्ज्वल करावे यासाठी कठोर परिश्रम घ्यावे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रगतीसोबतच आपल्या शाळेचा, पालकांचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा गटशिक्षणाधिकारी प्रमोद वळीव यांनी व्यक्त केली. शिक्षणातून केवळ यश मिळविणे नव्हे, तर उत्तम व्यक्तिमत्त्व घडविणे, स्वतःची क्षमता ओळखणे आणि जबाबदार नागरिक बनणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचा संदेश त्यांनी या मुक्तसंवादातून दिला.
याप्रसंगी आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वर्गात येऊन विद्यार्थ्यांशी साधलेला हा संवाद शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरला.

    You cannot copy content of this page