– राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड.
– नेफडो व तालुका क्रीडा समितीतर्फे सन्मान.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१३ ऑक्टोबर नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व नवी मुंबई पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग सिंगल इव्हेंट बेंच प्रेस अँड डेडलिफ्ट चॅम्पियनशिप २०२६ (RAW) या स्पर्धेत राजुरा येथील युवा खेळाडू युवराज रामगिरवार याने उल्लेखनीय कामगिरी करीत द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत त्याने चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या या यशामुळे राजुरा तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत युवराजने ८३ किलो वजन गटात स्क्वॉट प्रकारात १५५ किलो, बेंच प्रेसमध्ये ७५ किलो आणि डेडलिफ्टमध्ये १८५ किलो असे एकूण ४१५ किलो वजन उचलण्याची कामगिरी केली. उत्कृष्ट शारीरिक क्षमता, नियमित सराव, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले. त्याच्या या कामगिरीमुळे चंद्रपूर जिल्ह्यासह राजुरा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. युवराज रामगिरवार यांचा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे शॉल, रोपट कुंडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, भास्कर फरकाडे, बल्लारपूर तालुका अध्यक्ष तथा क्रीडा शिक्षक स्टेला मेरिस कॉन्व्हेन्ट बामनवाडा, श्रीरंग ढोबळे तालुका उपाध्यक्ष, भास्कर करमरकर वृक्षप्रेमी तथा तालुका उपाध्यक्ष नेफडो राजुरा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


