गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा : मतदारसंघातून जाणाऱ्या बामणी-राजुरा-लक्कडकोट (NH 930-D) या राष्ट्रीय महामार्गाचे काम सद्या प्रगतीपथावर सुरु आहे. सदर बांधकामादरम्यान रस्त्याची उंची आवश्यकतेपेक्षा १५ ते ३० फुटांपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कोणताही मार्ग उरलेला नाही. वर्धा नदी दक्षिण-पश्चिमेस रेल्वे लाईन, उत्तरेस वर्धा नदीचे पात्र आणि पूर्वेस उंचच्या-उंच राष्ट्रीय महामार्ग तयार होत असल्यामुळे या भागातील शेतांना चहूबाजूंनी वेढले गेले असून, त्या शेतकऱ्यांना शेतीची अवजारे, बैलगाड्या व ट्रॅक्टर नेणे पूर्णपणे अशक्य झाले आहे. याशिवाय, महामार्गाच्या अयोग्य बांधकामामुळे वर्धा नदीच्या पुराचे पाणी लगतच्या शेतात साचून पिकांचे अतोनात नुकसानही होत आहे. या गंभीर समस्येची दखल घेत आमदार देवराव भोंगळे यांनी स्थानिक शेतकऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.

नागपूर खंडपीठाने रिट पिटीशन क्र. १८९५/२०२५ मध्ये दिलेल्या आदेशाचा स्पष्ट संदर्भ विचारात घेऊन, शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तात्काळ अंडरपास (Underpass) आणि सर्विस रोड उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. महामार्गाच्या कामामुळे पाणी साचून भविष्यात याठिकाणी नापिकी येऊ नये यासाठी बांधकामात आवश्यक ते तांत्रिक बदल करून ठोस उपाययोजना करण्यासाठी भारत सरकारचे केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचेकडे पाठपुरावा करीत असून या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

या पाहणीदरम्यान सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता अभिषेक पुल्लावार, कनिष्ठ अभियंता मोहन गड्डीमे, स्थानिक शेतकरी संदीप खोके, भाजपचे शहर महामंत्री मिलिंद देशकर, मंगेश श्रीराम, श्रीकृष्ण गोरे, सागर भटपल्लीवार, डॉ. बुऱ्हाण, बबन पहानपटे, उमेश ठग, झाकीर शेख, निखिल खोके, मधुकर मेगानी, आबिदभाई, अरुण पहानपटे, पिंटू साळवे, विजय खोके, बंडू साळवे यांचेसह आदिंची उपस्थिती होती.
