गौतम नगरी चौफेर (रोहन कळसकर राजुरा):- रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर आणि झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उप जिल्हा रुग्णालय राजुरा येथे दोन दिवसीय मोफत आभा (ABHA) कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. हे शिबिर आज दिनांक १७ ऑगस्ट २०२६ आणि उद्या १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुले राहणार आहे.या महत्त्वपूर्ण शिबिराचे उद्घाटन चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बंडू रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी आभा कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड किती आवश्यक आहे, यावर प्रकाश टाकला. प्रत्येक नागरिकाने आपले आरोग्य कार्ड बनवून घेऊन शासनाच्या मोफत उपचार योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उप जिल्हा रुग्णालय राजुराचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक जाधव व वैद्यकीय अधिकारी डॉ. लहुजी कुळमेथे उपस्थित होते. त्यांनी रुग्णालयाच्या वतीने शिबिराला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूरच्या अध्यक्षा सुमनताई कळसकर, उपाध्यक्ष रतन बांबोळे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक भास्कर कुंदावार आणि संस्थेच्या सदस्या लीला कळसकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना मार्गदर्शन करत शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या.या शिबिरात पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली नोंदणी करून घेतली. रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि झाशी राणी सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिबिराच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या दोन दिवसीय मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

