भारतीय जनता पार्टी महिला आघाडीचा नगर परिषदेवर घागर मोर्चा.
गौतम नगरी चौफेर बादल बेले राजुरा, दि.१८ जून पंप हाऊस मध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे राजुरा नगर परिषदेचा पाणी पुरवठा मागील पाच दिवसांपासून ठप्प असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहे. विशेष करून ज्या नागरिकांकडे नगर परिषदेच्या पाण्याव्यतिरिक्त दुसरा पाण्याचा पर्याय नाही त्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यातही पहिले दोन दिवस नगर परिषदेने नागरिकांना विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने पाणी पुरवठा बंद असल्याचे कारण सांगून दिशाभूल केली. नंतर तांत्रिक कारणाने पाणी पुरवठा बंद असल्याचे कारण सांगितले गेले. ह्या सर्व प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने नागरिकांचा आवाज नगर परिषदेपर्यंत पोहोचवण्यासाठी नगर परिषदेवर भव्य घागर मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व भाजपचे शहर अध्यक्ष सुरेश रागीट, महामंत्री सचिन भोयर, माजी सभापती न.प. राजुरा राधेश्याम अडानिया, नगर परिषदेचे गटनेते प्रफुल्ल कावळे, नगर परिषद चे नगरसेवक भूपेश मेश्राम,अमोल चिल्लावार, मयुरी पहाणपटे, माजी नगरसेविका प्रीती रेकलवार, ऍड रजनी बोढे, तेजस्विनी कावळे , सौं किरण भटपल्लीवार ह्यांनी केले. नगर परिषदेवर हा मोर्चा पोहोचल्यावर ह्या महिलांनी नगर परिषदेसमोर मातीचे मडके फोडून नगर परिषद प्रशासनाचा निषेध केला. नगर परिषद अध्यक्ष अरुण धोटे ह्यांच्या विरोधात ह्यावेळी तीव्र निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. नगर परिषदच्या वतीने प्रशासकीय अधिकारी वानखेडे ह्यांनी गरिकांचे निवेदन स्वीकारले आणी पुढील चोवीस तासात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. ह्यावेळी सागर भटपल्लीवर, विनोद नरेंदूरवार, राजू वाटेकर, प्रदीप बोबडे, मंगेश श्रीराम, आकाश गंधारे, विवेक राठोड, प्रदीप मोरे, गणेश रेकलवार, रवींद्र आत्राम, नितीन सिडाम , रमा आईटलावार , रेश्मा चव्हाण आदीसह शेकडो महिला पुरुषांची उपस्थिती होती.

