HomeNewsनागपुर डिवीजन

महारांनी बांधलेल्या कमानीतून जाणार नाही, कमान पाडून टाकणार

– डॉ. बाबासाहेबांच्या नावाने उभारलेल्या प्रवेशद्वाराला जातीयवाद्यांचा विरोध
– बौद्ध बांधवांना जातीयवाद्यांच्या धमक्या, संरक्षण देण्याची बौद्ध बांधवांची मागणी
महारांनी बांधलेल्या कमानीतून जाणार नाही,
– कमान पाडून टाकणार
– डॉ. बाबासाहेबांच्या नावाने उभारलेल्या प्रवेशद्वाराला जातीयवाद्यांचा विरोध
– बौद्ध बांधवांना जातीयवाद्यांच्या धमक्या, संरक्षण देण्याची बौद्ध बांधवांची मागणी

गौतम नगरी चौफेर (मुंबई) – मालेगाव (जि  वाशिम), दि. २५ –  डोंगरकिन्ही (ता. मालेगाव, जि. वाशीम) येथे बौद्ध बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालयात रितसर ठराव घेऊन तसेच पोलिसांची परवानगी घेऊन गावाशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार या नावाने कमान उभारली आहे. ही कमान उभारल्याने गावातील काही जातीयावाद्यांचा पोटशुळ उठला आहे. त्यांनी कमानीला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. महारांनी बांधलेल्या कमानीतून आम्ही जाणार नाही. ही कमान आम्ही गाडून टाकू. या कमानीशेजारी दुसरी कमान बांधू. कोण काय करते ते पाहून घेऊ. विरोध करणाऱ्याला धडा शिकवू, अशा धमक्या ते बौद्ध बांधवांना देत आहेत. त्यामुळे गावातील बौद्ध बांधव भयभीत झाले आहेत. आज बुधवारी बौद्ध बांधवांनी मालेगाव येथे जाऊन कमानीला विरोध करणाऱ्या व बौद्ध बांधवांना धमकी देणाऱ्या जातीयवाद्यांविरोधात तक्रार दिली आहे. बौद्धांना व कमानीला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी बौद्ध बांधवांनी केली आहे. परंतु ठाणेदारांनी दोन दिवसांनंतर कारवाई करू, अशी चालढकल केल्याने ठाणेदार जातीयवाद्यांना पाठीशी घालत आहे की काय, अशी शंका बौद्ध बांधवांनी व्यक्त केली. जातीयवादी कधीही बौद्ध बांधवांवर हल्ला करू शकतात. त्यामुळे बौद्ध बांधवांना पोलिसांनी संरक्षण द्यावे, अशी कळकळीची मागणी बौद्ध बांधवांनी केली आहे.
    
👉डोंगरकिन्ही येथे बौद्ध बांधवांनी नुकतेच गावाशेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार उभारले आहे. हे प्रवेशद्वार ग्रामपंचायतमध्ये रितसर ठराव घेऊन तसेच मालेगाव पोलिस स्टेशनची परवानगी घेऊन उभारले आहे. हे प्रवेशद्वार उभारण्यासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळीनी सहमती दिली आहे. परंतु या प्रवेशद्वाराला गावातील काही जातीयवाद्यांनी विरोध केला आहे. काल मंगळवार दि. २४ फेबुवारी रोजी ६०-७० जातीयवाद्यांनी ग्रामपंचायतीत जावून धुमाकूळ घातला. या जातीयवाद्यांनी ग्रामसेवकाला धारेवर धरले. ग्रामपंचायतने महारांना प्रवेशद्वार उभारण्याची परवानगी का दिली? ती परवानगी रद करा अन्यथा आम्ही ते प्रवेशद्वार पाडून टाकू. महारांच्या कमानीखालून आम्ही जाणार नाही. ही कमान कशी उभी राहते ते आम्ही पाहून घेऊ. आम्ही महार आहोत काय? ही कमान आताच्या आता पाडून टाका नाहीतर ती आम्ही पाडून टाकू. कोण काय करते ते पाहून घेऊ. सर्वांना आम्ही झोडून काढू. किती ऍट्रोसिटी करतात ते पाहून घेऊ, अशा जातीयवाद्यांनी धमक्या दिल्या. हे जातीयवादी बौद्ध महिला, पुरुष दिसले की त्यांना पाहून जातीवाचक शीवीगाळ करीत आहेत. त्यामुळे बौद्ध बांधव भयभीत झाले आहेत.
    
आज बुधवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी गावातील सर्व बौद्ध बांधव मालेगाव पोलिस स्टेशनमध्ये गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार पाडण्याची धमकी देणाऱ्या गावातील जातीयवाद्यांविरोधात कारवाई करा, त्यांच्यापासून आमच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा, असा अर्ज बोद्ध बांधवांनी मालेगाव पोलिस स्टेशनच्या पोलिस ठाणेदाराला दिला आहे. परंतु ठाणेदाराने दोन दिवसानंतर कारवाई करतो, अशी चालढकल केली आहे. त्यामुळे बौद्ध बांधव भयभीत झाले आहेत. जातीयवाद्यांकडून कधीही आमच्यावर हल्ला होऊ शकतो. आमच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे पोलिसांनी जातीयवाद्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी. आम्हाला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी बौद्ध बांधवांनी केली आहे.
▪️▪️▪️
💙*दैनिक “वृत्तरत्न सम्राट*
गुरुवार, दि.२६ फेबुवारी २०२६💙

COMMENTS

You cannot copy content of this page