गौतम नगरी चौफेर // भंडारा :- केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्ली – महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने संविधान दिन, जागतिक मानवाधिकार दिन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती, राजमाता जिजाऊ जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जिल्हा परिषद सभागृह, भंडारा येथे भव्य संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘संविधान सन्मान स्पर्धा परीक्षा – २०२५’ मध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके, सन्मानपत्रे तसेच भारतीय संविधानाची प्रत देऊन गौरविण्यात आले.
तसेच या प्रसंगी समाजात निर्भीडपणे व सातत्याने सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवक श्रीकृष्ण एस.देशभ्रतार यांचा केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्ली द्वारा” राष्ट्रीय गौरव आयकॉन पुरस्कार – २०२६” देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले, राष्ट्रीय कार्याध्यक्ष ॲड. विजयकुमार कस्तुरे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी, जिल्हा सरकारी वकील ॲड. विनोद भोले, भंडारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन रहांगडाले, कार्यकारी अभियंता श्री. व्ही. एस. चुरहे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान भारतीय संविधानाचे महत्त्व, मानवाधिकारांचे संरक्षण तसेच समाजहितासाठी कार्य करण्याची आवश्यकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. देवानंद नंदागवळी यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रो. शीलवंतकुमार मडामे यांनी केले. या यशस्वी आयोजनासाठी केंद्रीय मानवाधिकार संघटनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


COMMENTS