– राज्यातील दोन लाख महिला व कर्मचारी बसणार उपोषणाला.
गौतम नगरी चौफेर राजुरा – ११ डिसेंबर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ति तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातून तब्बल दोन लाख महिला व कर्मचारी ११ डिसेंबर पासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात उपोषणाला बसणार असल्याचा इशारा उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने दिला आहे. यामध्ये राजुरा तालुक्यातून शेकडो महिला उपोषणकरिता रवाना झाल्या आहेत. कर्मचारी कॅडर संघटना तालुका राजुरा महिला कॅडर संघटनेच्या अध्यक्षा शीला दिलीप जाधव, सचिव शोभा विशाल झाडे, कर्मचारी कॅडर संघटना अध्यक्ष ज्ञानेश्वर अवनेनवार, सचिव मनोज किन्नके, सह सचिव रवी रघाताटे, कोषाध्यक्ष सतीश सूर यांच्या मार्गदर्शनाखाली रेखा मडावी, शोभा मंढरे, विजया गेडाम, ज्योत्स्ना पिंपळकर, प्रिया बोरकर, ज्योती धोंगडे, संगीता धोटे, अर्चना बोंडे आदींसह शेकडो महिला राजुरा तालुक्यातून नागपूर हिवाळी अधिवेशनवर उपोषणाला पंचायत समिती चौक राजुरा येथून निघाल्या.

राज्यात सध्या ५२ हजार समुदाय संसाधन व्यक्ती आणि २८०० कंत्राटी कर्मचारी उमेद अंतर्गत काम करत आहेत. त्यांच्या सेवाशर्ती, ओळख, वेतनवाढ, विमा सुविधा आणि सुधारित एचआर मॅन्युअल लागू करण्याच्या मागण्या गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहे. या मागण्यांसाठी ५ डिसेंबर रोजी ग्राम विकास मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मागील नऊ महिन्यात दोन वेळा ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. बैठकीत सकारात्मक भूमिका दाखविण्यात आली होती . मात्र प्रत्यक्षात शासन निर्णय किंवा अंमलबजावणी झालेली नसल्याने संघटनेत नाराजी निर्माण झाली आहे. उमेद अभियान हे केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून चालणारे एनआरएलएम चे प्रमुख प्रकल्प असून केंद्रातून अधिक निधी पुरविला जातो केंद्राने मागील वर्षी सुधारित एचआर मॅन्युअल लागू करण्याच्या सूचना दिल्या असतानाही महाराष्ट्रात ते अद्याप लागू झालेले नाही. आता नागपूर येथील आंदोलनांकडे सर्वांचे लक्ष लागले असून शासन काय सकारात्मक पाऊल उचलते याकडेही उमेद कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.


COMMENTS